सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी ७५ कोटी ६५ लाख या विस्तारीकरण व ८५ कोटी १२ या सहवीजनिर्मीती प्रकल्पास सभासदांनी ऑनलाइन हातवर करून एकमताने मंजुरी दिली. यामुळे आता सोमेश्वर कारखान्याचा अतिरिक्त उसाचा प्रश्न मिटणार आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या मुख्य कार्यालयात सोमवारी (दि.२९) रोजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभेला सुरुवात झाली. कोरोना पार्श्वभूमीवर सभा ऑनलाईन असूनही तब्बल पाच तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यात सर्व विषयांला मंजुरी देत सभा खेळीमेळीत पार पडली. सभासदांकडून आलेल्या प्रत्येक प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी विस्तारीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. विषयपत्रिकेचे वाचन कार्यालयीन अधिक्षक कालिदास निकम यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष शैलेश रासकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक मंडळ, सर्व अधिकारी उपस्थित होते. सभेत माजी शहाजी काकडे यांनी कारखान्यावर अतिरिक्त उसाचे संकट आहे, कारखान्याचे विस्तारीकरण मूलभूत गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे हाल कुत्रे खाणार नसल्याचे सांगत परतीच्या ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याची मागणी त्यांनी केली. विक्रम भोसले यांनी ठिबक सिंचन साठी जिल्हा बँकेकडून कर्ज मिळावे, तसेच कारखाण्यामार्फत उसाची रोपे मिळावीत अशी मागणी केली. मदन काकडे यांनी अहवालात साखर मूल्यांकन कमी दिसत असल्याने त्याचा परिणाम ऊस दरावर दिसत आहे. तसेच मशनरी देखभाल व दुरुस्ती खर्चात तब्बल ९ कोटी २८ लाख खर्च जादा दिसत आहे. तसेच अहवाल पान नंबर २५ वर कारखान्यावर एकूण १८८ कोटी कर्ज दिसत आहे. त्याच बरोबर २०१९-२० चा साखर उतारा पडण्याचं काय कारण असे प्रश्न उपस्थित केले. भाजपचे दिलीप खैरे यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्याची सूचना करून विस्तारीकरणाबाबत करखान्याकडे डीपीआर नसल्याचे समजत आहे. असा सवाल उपस्थित केला.
दत्ताजी चव्हाण, अजय कदम सुनील भोसले, राजेंद्र जगताप, कांचन निगडे, संभाजी होळकर, रामदास धापटे, राहुल भगत, अजिंक्य सावंत, दिलीप फरांदे, दिली खलाटे, ऋचा धुमाळ, सचिन टेकवडे, मिलींद कांबळे, धर्यशील काकडे, रवींद्र भापकर कल्याण तुलशे, विजय काकडे, कौतुभ चव्हाण, माणिकराव झेंडे, रमाकांत गायकवाड आदी सभासदांनी ऑनलाइन सभेत सहभाग घेतला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सर्व सभासदांच्या शंकांचे निरासन केले.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, चालू हंगामात सोमेश्वरने ९ लाख ३१ हजार ऊसाचे गाळप करत १० लाख २५ हजार साखरेचे उत्पन्न घेतले आहे. दीड लाख टन उस इतर कारखान्याला दिला असून अतिरिक्त ऊसाचे संकट आहे. उर्वरित सर्वच शेतकऱ्यांचे गाळप पूर्ण करणार आहोत. सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात २६५ या ऊसाची जात सर्वाधिक असूनही जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची रिकव्हरी आणि एफआरपी सोमेश्वरचीच आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखानदारी अडचणीत आली आहे मात्र तरीही यातून मार्ग काढत सभासदांना जास्तीचा दर देण्याचा प्रयत्न केला आहे. सन २०२१-२२ या हंगामासाठी कारखान्याकडे ३७ हजार ९०९ एकर ऊसाची नोंद झाली असून जवळपास १५ लाख २० एवढ्या ऊसाचे गाळप होणार आहे. शरयू कारखान्याला सोमेश्वरच्या एफआरपी प्रमाणेच करार करून ऊस देण्यात येत असल्याचेही जगताप म्हणाले.
सन २०१८ मध्ये विस्तारीकरणास मंजुरी मिळाली होती मात्र काही कारणाने विस्तारवाढ तहकूब करावी लागली होती. याचा गंभीर परिणाम सध्याच्या आणि पुढील हंगामावर होणार आहे. मागील दोन वर्षात केंद्र सरकारने साखरेला कोटा पध्दत ठरवून दिल्याने साखर विकली जात नाही. सध्या सोमेश्वरकडे १४ लाख क्विंटल साखर शिल्लक असून संपूर्ण गोदामे भरली आहेत. विस्तारीकरणासाठी निधी उभारताना जिल्हा बॅंकेकडून ७० टक्के कर्ज तर ३० टक्के कर्ज स्वभांडवलातून उभारणार आहोत. कारखान्यावर चालु मध्यम मुदतीचे ५१ कोटी कर्ज असून याचे सर्व हप्ते सुरळीतपणे सुरु आहेत.
पुरुषोत्तम जगताप अध्यक्ष--------
राज्यातील साखर कारखान्यांनी ब्राझिल सारखा पॅटर्न राबविणे गरजेचे आहे. ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करावे लागणार आहे. फक्त साखरेमुळे बॅंकाचे कर्ज वाढत आहे. इथेनॉलपासून फायदा होत असल्याने सभासदांना दर वाढवून देता येणार आहे त्यामुळे यापुढील काळात डिस्टलरीसह वीजनिर्मिती प्रकल्प वाढवावे लागतील.
शेतकरी बनला हायटेक-------
आज सोमेश्वर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कोविड च्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सभा ऑनलाइन पार पडली. यासभेत काही सभासदांनी थेट उसाच्या शेतातून तर काही सभासदांनी सिंगापूर सारख्या देशातून या सभेत सहभाग घेतला.