सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
साखरखरवाडी(ता. फलटण) येथील श्री दत्त इंडिया शुगरने मार्च महिन्यात गाळपास गेलेल्या उसाचे बील महिना होऊनही जमा केले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. फलटण, खंडाळा, माळशिरस तसेच बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परीसरातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाचे लवकर गाळप व्हावे या उद्देशाने आपला ऊस या कारखान्याला दिला मात्र आता शेतकऱ्यांवर आपल्या बीलासाठी राम भरोसे म्हणण्याची वेळ आली आहे.
१ ते १५ मार्च आणि १५ मार्च ते ३० मार्च या दरम्यान गेलेल्या ऊसाचे पेमेंट अद्यापही मिळाले नाही. वास्तविक ऊस गेल्यानंतर कारखान्यांना १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपी खात्यावर वर्ग करण्याचे बंधन कारखान्यांना आहे. मात्र महिना उलटूनही उसबील मिळत नसल्याने व्याजासह बीलाची रक्कम मिळण्यासाठी साखर संचालक पुणे येथील कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा उस घातलेल्या शेतकऱ्यांनी दिला आहे. आर्थिक वर्षात मार्च अखेर, वीजबील वसुली, व्यावसायिक देणी, सोसायट्यांची कर्ज, कोरोना महामारी या संकटामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. परीसरातील बहुतांश कारखान्यांनी जास्त दराची एफआरपी वर्ग करत सोसायटीचे हप्तेही जमा केले आहेत. मार्च महिन्यात ७० ते ८० हजार टनाची सुमारे २५० कोटींची एफआरपी श्रीदत्त इंडिया शुगर ने थकविल्यामुळे शेतकऱ्यांवर येरे माझ्या मागल्या असे म्हणण्याची वेळ आली आहे.
न्यू फलटण शुगरने या अगोदरही शेतकऱ्यांचे पैसे वेळेत दिले नाहीत. सुरुवातीला गतवैभव प्राप्त असलेल्या या कारखान्याला मागील काही वर्षात उतरती कळा लागली आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार देशोधडीला लावायचे काम मागील काही वर्षात झाले आहे. सोमेश्वर परीसरातील सुमारे ३० हजार टन ऊस शेतकऱ्यांनी वीजपुरवठा खंडीत झाल्याने आणि ऐन उन्हाळ्यात ऊसाचे नुकसान होऊ नये म्हणून या कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला मात्र त्या शेतकऱ्यांवर आता हात चोळत बसण्याची वेळ आली असून लवकरात लवकर पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
................
कैलास एकनाथ जगताप, शेतकरी मगरवाडी
कोरोना परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच पुन्हा लॉकडाऊन झाले आहे. वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. शेती मशागतीची कामे उरकायची आहेत. यासाठी कारखान्याने तातडीने बील जमा करावे.