सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
मुरूम (ता. बारामती) या पंचायत समितीच्या सभापतींच्या गावातच कोरोनाचा विस्फोट झाला असून गावाला कोणीही वाली राहिला नसल्याचे चित्र आहे. कोरोनाची रुग्णसंख्या शेकडोंच्या वर गेली असूनही गावात निम्म्याही नागरीकांना लसीकरण झाले नाही. ग्रामपंचायत सदस्य फक्त नावालाच असून लसीकरण आणि ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्याकडे दोन ग्रामपंचायतीचा कारभार असल्याने भाऊसाहेब ही आठवड्यातून एखाद दुसऱ्यावेळी उपस्थित राहतात. पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे यांच्या गावातच पुर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने इतर ग्रामपंचायतीची काय अवस्था असेल हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
ग्रामस्थ रोज तक्रारी करूनही ग्रामपंचायत त्यांच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेत नाही. गावठाण, वाड्या वस्त्या, म्हातोबामाळ, साळोबावस्ती, भंडलकर वस्ती येथील नागरीकांना लसीचा पहिलाच डोस मिळाला नाही याउलट काहींनी वशिला लावत लसीचे डबल डोस घेतले आहेत. आरोग्य सेवक गावात अरेरावी करत असल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर झाला असून ग्रामस्थांना आठ- आठ दिवस पिण्याचे हक्काचे पाणी मिळत नाही.नदीकिनारी आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या निरा डाव्या कालवा असूनही गावात पाण्याची बोंब होतेच कशी हा प्रश्न आहे. गावाकडे ना सरपंच लक्ष देतात ना प्रमुख पदाधिकारी ना सभापती त्यामुळे मुरुमकर सध्या रामभरोसे जीवन जगत आहेत. सभापती एकीकडे तालुक्यात दुसऱ्या गावात जावून दौरे आणि कोरोनाचा आढावा घेत आहेत मात्र स्वतःच्या गावात त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. राजकारण-राजकारण करायचे किती हा येथील सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. एका माजी पदाधिकाऱ्यांने तर थेट गाव विकणे आहे असे म्हणत यंत्रणा किती कमकुवत झाली आहे याचा पाढाच वाचून दाखवला.