सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
करंजेपूलनजीक शेंडकरवाडी (ता. बारामती) येथील मंगेशकुमार राजकुमार शेंडकर या संशोधक विद्यार्थ्यास 'व्हीडीगुड प्रोफेशनल असोसिएशन' या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित संस्थेकडून 'आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार-२०२१' हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोईमतूर येथे 10 व 11 सप्टेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तो दिला जाणार आहे. कोयना-वारणा भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये भूकंपातही टिकेल अशी घरबांधणी आणि सद्यस्थितीतील घरांची पुनर्रचना कशी करता येईल याबाबत त्याने केलेले संशोधन विचारात घेतलेले आहे.
मंगेश सध्या 'आयआयटी वाराणासी' येथे स्ट्रक्चरल सिव्हील इंजिनिअऱिंग या विभागात 'कोयना वारणा क्षेत्रातील घरांचे मूल्यमापन, पुनर्रचना आणि भूकंपअवरोधक घरांची निर्मिती' या विषयावर संशोधन करत आहे. यापूर्वी त्याने 'आयआयआयटी हैदराबाद' येथे 'इंटरलॉकिंग ब्रिक्स' (एकमेकांत गुंतणाऱ्या वीटा) या विषयावर मूलभूत संशोधन केले होते. तेही भूकंपअवरोधक घरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अशा विविध विषयांवरील आठ संशोधनपर निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले. जगभरात प्रसिध्द होणाऱ्या अशा संशोधनातून 'व्हिक्टरी रिक्वायरस डेडीकेशन वुईथ गुड इंटेन्ट' (व्हीडीगुड) या संस्थेने निवडक लोकांना आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर केले आहेत. मंगेश याला कोईमतूर (तामिळनाडू) येथे १० व ११ सप्टेंबरला आयोजित केलेल्या संशोधन परिषदेत गौरविले जाणार आहे.
मराठी माध्यमात शिकलेल्या मंगेशने जिल्हा परिषद शाळा सोमेश्वरनगरमध्ये प्राथमिक, सोमेश्वर विद्यालय व विद्या प्रतिष्ठानमध्ये माध्यमिक तर अवसरीमधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर नांदेड येथे 'गुरू गोविंदसिंगजी इंस्टिट्टूट ऑफ इंजिनिअऱिंग अँड टेक्नॉलॉजी' या महाविद्यालयात 'एमटेक' पदवी प्राप्त केली. यानंतर त्याने आयआय़टीमध्ये संशोधन करण्यासाठी पीएचडीची प्रवेश परीक्षा दिली. देशातून मोजके विद्यार्थी देणाऱ्या या परीक्षेतून मंगेशला आयआयटी वाराणासीमध्ये संशोधनाची संधी मिळाली. डॉ. एस. मंडल, डॉ. मैती, डॉ. प्रदीपकुमार यांचे त्यास मार्गदर्शन मिळत आहे. पाटबंधारे खात्यातून नुकतेच निवृत्त झालेले अभियंता राजकुमार शेंडकर यांचे ते सुपुत्र तर पत्रकार संतोष शेंडकर यांचे पुतणे आहेत.
कोयना वारणा क्षेत्रात मंगेश याने एकशे वीस घरांचे सर्वेक्षण, इव्हॅल्युशन केले असून पाच हजार घरांची माहिती घेतली आहे. अनेक घरे 'डेंजर झोन' मध्ये आढळून आली. आयआयटी वाराणासीने त्याच्या विनंतीवरून स्कॅनिंग यंत्र उपलब्ध करून दिले असून लवकरच घरांचे स्कॅनिंग करून अधिक तपशील उपलब्ध होणार आहे. त्याचे इंटरलॉकिंग ब्रिक्स आणि भूकंपअवरोधक घरे ही दोन्ही संशोधने भूकंपप्रवण क्षेत्रातील घरबांधणीसाठी व घराच्या पुनर्रचचनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. याचसाठी संशोधन पूर्ण झाल्यावर तो आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पाटबंधारे व आयआयटीस अहवाल देणार आहे.
मंगेश म्हणाला, आतापर्यंत अनेकवेळा भूकंप झाले. परंतु त्या भागातील बांधकाम तज्ञांचे अजून भूकंपअवरोधक घरांच्या बांधणीकडे लक्ष नसल्याचे मुलाखतींमधून लक्षात आले. मोठा भूकंप झाला तर मोठा धोका होऊ शकतो. सध्या खडकांच्या स्तराचा अभ्यास होत आहे. मात्र भविष्यातील हानी टाळण्यासाठी इमारत बांधणीसाठीही मार्गदर्शक तत्वे देणे आवश्यक आहे. तीन मजल्यांपुढे इमारती नकोत, पंधरा वर्षापुढील इमारतींचे दर सात वर्षाला स्ट्रक्चरल ऑडीट व्हावे, ऑडीटनुसार घरांचे पुनर्वसन व्हायला हवे.
चौकट ः एकाच घरात दोन शास्त्रज्ञ
मंगेशचे चुलते डॉ. चंद्रशेखर शेंडकर यांनीही आय़आयटी खरगपूर येथून पीएचडी प्राप्त केली असून वैद्यकीय उपकरणांबाबतीत अनेक संशोधन करून पेटंटही मिळविले आहे. सध्या सिनियर सायंटीस्ट पदावर ते खासगी कंपनीत कार्यरत आहेत. आता पुतण्याही त्याच पावलांनी आयआयटी वाराणासीत संशोधन करत असून सायंटीस्ट बनण्याच्या मार्गावर आहे. बारामती तालुक्यातील शेंडकरवाडीसारख्या आडबाजूच्या शेतकरी गावातील एकाच घरात आयआयटीचे दोन संशोधक असण्याचा दुर्मिळ योग साधला आहे.
---