उमेश दुबे
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भाटघर धरणाच्या पाणीपातळीत अत्यंत घट झाली आहे. त्यामुळे तेथील जलविद्युत निर्मिती केंद्रातील वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे. अशी माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली.
धरणातून 30 मे रोजी होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरण परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा शिल्लक राहावा या हेतूने विसर्ग बंद केला आहे. सद्यस्थितीत धरणार 6.40 टक्के पाणीसाठा आहे. यामुळे जलविद्युत निर्मिती बंद झाली आहे. दरम्यान धरण 100% भरल्यानंतर येथील जलविद्युत वीजनिर्मिती सुरू केली जाणार आहे. यादरम्यानच्या काळात तेथील यंत्रणेची दुरूस्तीची कामे सुरू राहणार आहेत.
इंग्रज राजवटीत 1918 साली भाटघर धरण बांधण्यात आले. यानंतरच्या काळात भाटघर धरणाच्या पूर्व बाजूला भिंतीलगत जलविद्युत निर्मिती केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उभारले. ही इमारत सात मजली असून, जमीन पातळीच्या वर तीन मजले आहेत. तर जमीन पातळीच्या खाली चार मजले आहेत. या इमारतीचे बांधकाम 1978 साली पूर्ण झाले होते. यानंतर जलविद्युत वीजनिर्मिती सुरू झाली. जलविद्युत वीजनिर्मिती केंद्रात 24 तासांत 16 मेगावॅट वीजनिर्मिती होते. या केंद्रात अधिकारी व कामगारवर्ग असे एकूण 28 जण सेवेत आहेत.