सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निपाह आणि कोरोना व्हायरस मध्ये अनेक उपप्रकार आहेत, लोकांनी घाबरू नये. निपाह व्हायरस हा नवीन नाही, आपल्याला संशोधनातून उशिरा समजले असल्याचा दावा वटवाघुल संशोधक डॉ महेश गायकवाड यांनी केला आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे नाव एकच पण प्रकार अनेक. जसे एका नावाची अनेक माणस असतात, मात्र ती सगळी वेगवेगळी असतात. त्याप्रमाणे निपाह व्हायरस मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, सर्वात जास्त धोकादायक प्रकार मलेशियात असणाऱ्या फलहारी वटवाघळामध्ये आढळतो, आपल्या भारतातील वटवाघळामध्ये नाही, म्हणून घाबरून जाऊ नये, फक्त काळजी घ्यावी लागेल. कुठही फिरताना झाडाखाली असणारी पक्षी, वटवाघूळ यांची उष्टी फळे खाऊ नका, बस एवढंच.
वटवाघळाच्या शरीरात अनेक जीवघेणे व्हायरस असतात, मात्र त्याचा आणि आपला काहीच संबध नाही. आपण जर त्यांची शिकार अथवा त्यांच्या अधिवासातील लुडबुड थांबवली तर, आपल्याला काहीच त्रास होणार नाही. अनेक वर्षे हे प्राणी अश्या अनेक जीवघेण्या व्हायरस बरोबर जगतायेत, आता त्यांची प्रतिकारशक्ती अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे हेच व्हायरस मानवाकडे आले कि मग मात्र आपल्याला जगणे अवघड होत चालले आहे.
आता मात्र मानवासाठी हि धोक्याची घंटा नक्कीच आहे असे समजावे. कारण जसजसा आपला निसर्गात हस्तक्षेप वाढत जाईल तसतसे अनेक विषाणू, जीवाणू, बुरशी आपल्याकडे धाव घेणार हे आता नक्कीच झालेले आहे. मात्र हे सगळे न दिसणारे जीव मानवासाठी का बर जीवघेणे झाले असावेत याचा थोडा तरी अभ्यास करणे गरजेचे वाटते. अगदी हवेत सर्वत्र असणारी बुरशी सुद्धा आपल्याला घातक ठरत आहे याचा अर्थ आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली आहे, वेळीच सावध होणे अत्यावश्यक आहे.
जगभरात संशोधन घडत असते, भारतात अलीकडे संशोधन बाळसं धरत आहे. आपल्या NIV संशोधन संस्थेने महाबळेश्वर मधील काही वन्यजीवाचे संशोधन केले यात वटवाघळे सुद्धा आहेत. अगदी सन २०२० मार्च मध्ये वटवाघळाच्या दोन प्रजातीवर सुद्धा संशोधन केले. यात त्यांना निपाह व्हायरस सापडला, मात्र असे व्हायरस पूर्वी पासूनच वटवाघळाच्या शरीरात आहेत. अगदी गेल्या वर्षी 2019 ला सुद्धा असेच संशोधन केले होते त्यात त्यांना बॅट कोरोना व्हायरस सापडला होता. मात्र मिडीयाने घाईने हा बॅट कोरोना व्हायरस किती घातक आहे हे प्रसारित केले आणि मोठी गडबड सुद्धा झाली. कारण कि यात हा व्हायरस कोविड १९ आजार पसरवत नाही हे महत्वाचे सांगायला विसरले आणि लाखो वटवाघळे मारली गेली. हा अज्ञानाचा कळसच म्हणावे लागेल. बर बॅट कोरोना व्हायरस मुळे मानवाला कसलाही धोका नाही, हे संशोधन सिद्धही झाले होते. आणि बॅट कोरोना म्हणजे सार्स कोरोना व्हायरस नाही, हे बातमीदाराला समजले नसल्याने लाखो वटवाघळे मारली गेली, म्हणून संशोधनातील बातमी करताना खूप जबाबदारीने केली पाहिजे, अन्यथा विनाश अटळ असेल.
आतासुद्धा बातमी कशी येईल लवकर, यामुळे निपाह व्हायरस मधील हा व्हायरस सुद्धा नक्की मानवाला घातक आहे का, याबद्दल अजूनही संशोधकांना सुद्धा माहिती नाही, तोपर्यंत आपल्या मिडीयाने जगासमोर दुसर संकट म्हणून बातमी केली, हा केवढा बालीशपणा आहे. अहो निपाह व्हायरस मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्हायरस आहेत, ज्यामुळे मानव जातीला कुठलाही धोका नाही, पण संशोधन होण्याअगोदरच हा निपाह आणि मलेशिया मधील फळहारी वटवाघूळात असणारा एकच व्हायरस अशी बातमी करणे म्हणजे वन्यजीव कायदा १९७२ नुसार गुन्हाच नव्हे काय.
यात संशोधकांनी सुद्धा थांबायला शिकले पाहिजे, उठसूट मिडियाकडे संशोधन देताना काळजी घेणे गरजचे आहे, अन्यथा हा बातमीदाराचा किंवा संशोधकांचा बातमी करण्याचा हावरटपणा वन्यजीवांच्या अंगाशी येतोय. अगदी गेल्यावर्षी लाखो वटवाघळे मारली गेली, त्यांची झाडे कापली गेली, अधिवास नष्ट झाले, शेकडो फळझाडे तोडून टाकली. अशी जर जैवविविधता नष्ट होत राहिली तर मग अनेक सूक्ष्मजीव आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही, एवढ सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
मलेशिया मधील मोठे फळहारी वटवाघूळामध्ये निपाह व्हायरस सापडतो, मात्र तिथले नागरिक खूप काळजी घेत, जमिनीवर पडलेली पिकलेली उष्टी फळे अजिबात खात नाहीत. शिवाय वन्यजीव व स्वतामध्ये सामाजिक अंतर ठेवतात. तसेच त्यांच्यात जनजागृती खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. अगदी सन १९९८ ला प्रथम त्यांना समजले आणि मग सन २००१ साली आपल्या पूर्वेकडील राज्यात प्रथम सिलीगुडी ला नोंद झाली, आणि सन २०१८ साली केरळ मध्ये काही रुग्ण सापडले. मात्र हे सर्व रुग्ण मलेशिया मधून आलेले होते. अनेक वटवाघळावर संशोधन सुद्धा केले मात्र निपाह व्हायरस सापडला नाही. तद्नंतर सन २०२० मध्ये NIV ने संशोधन करीत निफाह व्हायरस शोधला मात्र तो निपाह हेनिपाव्हायरसच आहे का??? जो मलेशिया मधील टेरोपस व्हॅमपायरस प्रजातीच्या वटवाघूळाच्या शरीरात असतो, हि प्रजाती भारतात सापडत नाही, हे सिद्ध केले कि नाही याबाबत शंकाच आहे.
आपल्याभोवती अनेक असणार्या प्राण्यामध्ये अनेक व्हायरस असतात, यात कुत्राममध्ये तर रेबीज व्हायरस असतो, मग आपण घाबरतो का, फक्त काळजी घेणे आवश्यक आहे. जगभरातील सर्व जीवांमध्ये विविध प्रकारचे विषाणू व जीवाणू असतात, त्यातील काहीच विषाणू व जीवाणू मानवासाठी घातक असतात. मात्र मानवाची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर मग घाबरून जगायची गरज नाही, फक्त काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
वटवाघळे निशाचर प्राणी आहेत, त्यामुळे तसाही आपला आणि त्यांचा संबंध येत नाही. शिवाय रात्रभर झाडावरील बिया एका जागेवरून दुसरीकडे टाकण्याचे महत्वाचे काम करीत असतात, अर्थात वर्षभर वृक्षारोपण कार्यक्रम रात्रभर सुरु असतो, आपल्या सारख्या नव्हे 5 जून चा, शिवाय कीटक खाणारी वटवाघळे कीटक नियंत्रण करीत असतात. आपण फक्त उष्टी फुले,फळे खाऊ नयेत, मग ती कुठल्याही वन्यप्राण्यांची असोत.एवढी काळजी घेतली तर मग भीती कश्याला हवी निपाहची.
महाबळेश्वर मध्ये एकही जनाला आजपर्यंत निपाह आजार झाल्याची नोंद सापडली नाही याचा अर्थ आपल्याला घाबरण्याची अजोबात गरज नाही. NIV ने महाबळेश्वर मधील स्थानिक लोकांवर संशोधन केले पाहिजे, मग समजेल निपाह आहे कि, अजून दुसरच काय... संशोधन होणे गरजेचे आहे. शिवाय वन विभाग, इतर संशोधकांना सुद्धा NIV ने विश्वासात घेऊन संशोधन करणे गरजेचे आहे. अन्यथा संरक्षण व संवर्धन कसे करावे, हे त्यांना कधीच समजणार नाही. संशोधन हे सर्वांगीण असावे, ते अर्धवट असले कि मग वन्यजीवांचा नाश अटळच आहे.
आपल्या अवतीभोवतीची जैवविविधता वाढली तरच आपल्या जीवनात आनंद व समाधान असेल. यापुढे जरा जरी कोरोना काळात आपल्याला आपलेच जीवन समजले असेल तर मग थांबून निसर्गाच्या सानिध्यात जीवनशैली सुरु करा, तरच जगाल.
शिवाय निपाह व्हायरसला लोकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. कारण हे सर्व व्हायरस जगभरात आपल्या अगोदरपासून आहेत. आपल्याला आज समजले म्हणजे नवीन नव्हे. महाबळेश्वर मधील काही गुहा खूप मोठ्या आहेत, जिथ मी स्थानिक लोकांबरोबर गेली २० वर्षे काम करीत आहे. अजून तरी स्थानिक लोक व मी जिवंत आहे, निपाह व्हायरसने मेलो नाही, कारण तो मलेशियामधील असणार्या वटवाघळामधील नक्कीच नाही... आणि जरी असेल तरी घाबरू नये, कारण आपल आणि वटवाघळामधील सामाजिक अंतर जास्तच आहेच. शिवाय सर्वच वटवाघळामध्ये निपाह व्हायरसने आजारी असतात असे अजिबात नाही, नाहीतर सगळी वटवाघळे मरतील. निसर्गात जो कुमकुवत झाला तो संपला, हा नियमच आहे. जि वटवाघळ कुमकुवत असतील ती मरतात, मात्र शक्तिमान असतात ती जगतातच.
यापुढील काळात जो मातीत, सूर्यप्रकाशात काम करेल, घाम गाळेल. नियमित व्यायाम, चालणे, पोहणे, सकस आहार, डोंगरावरील ट्रेक्स करतील, जीवनशैलीत बदल करून नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करतील तेच टिकतील.