सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गुंजवणी प्रकल्पाच्या बंद जलवाहिनी कामाच्या शुभारंभासाठी आपली वेळ मिळावी याबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. मात्र पुरंदर चे आमदार संजय जगताप यांचेवर या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, राज्यमंत्रीपदाच्या काळात मोठ्या मेहनतीतून मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. प्रकल्पाच्या बंद जलवाहिनीच्या कामालाही मागील वर्षी सुरवात केली. भोर आणि वेल्ह्यात जलवाहिनीचे काम चालू आहे. परंतु लवकरात लवकर योजना पूर्ण करण्याच्या हेतूने जलसंपदा विभागाशी समन्वय साधत काही दिवसांपूर्वी मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरवात केली आहे.
मात्र या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम कॉंग्रेसचे स्थानिक आमदार संजय जगताप
यांच्याकडून केले जात आहे. तोंडल (ता.पुरंदर) येथे काम सुरु केल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद
करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते. वास्तविक बंद जलवाहिनीद्वारे १०० % सूक्ष्म सिंचन करणारा हा देशातील पहिला प्रकल्प असून तो सबंध देशाला नवी दिशा देणारा आहे. त्यासाठी तब्बल १३१३ कोटी रुपयांना मी मंजुरी मिळवली होती. हरित लवाद, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग अशा अनेक ठिकाणी सातत्याने याचिका करून हे काम होऊ नये यासाठी मला त्रास देण्यात आला. सुदैवाने मी या सगळ्या अडथळ्यांना पुरून उरलो आणि आज जलवाहिनीचे काम वेगाने सुरु आहे.
तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार बंद जलवाहिनीचा हा प्रकल्प पाहून इतके प्रभावित झाले की त्यांनी
सबंध देशभरात यापुढे कालव्याने पाणी देण्याची पद्धत बंद करून जलवाहिनीचे धोरण स्विकारले. ज्यांनी प्रकल्प होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या हस्ते अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्याइतकी
सबब या कामाचा शुभारंभ आपल्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत
पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हावा अशी माझी इच्छा आहे. कोरोनाचे संकट असल्याने ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ झाला तरी चालेल. आपणास विनंती आहे की याकामी आपल्याकडून वेळ मिळावी असे पत्रात नमूद केले आहे.