नीरा : सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे बोलाईमात डोंगराच्या पायथ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी कारवाई केली असून, बैलगाडी शर्यत भरवणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करत, १२ मोटारसायकल, १० बैलगाडे ताब्यात घेतले आहेत.
जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी दिलेल्या माहितीनुसार. प्रमुख संयोजक अजय राखपसरे रा. पिंपरे (खुर्द) अनुसया नगर, आय्याज हबीब सय्यद रा.नीरा पोकळे वस्ती, मनिष थोपटे रा. पिंपरे (खुर्द) ता. पुरंदर, ऋषिकेश संतोष गोरे रा. मुरुम, महेश क्रुष्णा गाडवे रा.वघळवाडी, दादा हरिभाऊ लकडे रा.निंबूत छप्री ता. बारामती यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच बरोबरच बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसह, १२ मोटारसायकल, १० बैलगाडे ताब्यात घेतले असुन, शर्यत ज्या ज्या व्यक्तींच्या जागेवर (माळराणावर) झाली त्या जागा मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती महाडीक यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज रविवार दि.१३ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांना मिळालेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी - कर्नलवाडी रोडलगत माळरानावर पश्चिमे कडील बोलाईदेवी डोंगराच्या पायथ्याला बैलगाडा शर्यती भरवण्यात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोतपागर. सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड, संदिप मोकाशी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव, हरिश्चंद्र करे, होमगार्ड मंगेश गायकवाड, भरत पिसाळ, स्वप्निल भेचके, प्रसाद तारु, मोहन साळुंखे, किरण शिंदे व पोलीस मित्र रामचंद्र कर्णवर हे खाजगी वाहनाने या माळरानावर गेले असता काही लोक तिथे जमलेले दिसले.
यावेळी काही वाहनांमधून बैलगाडा व बैलजोडी भरून वाहने उभी होती. त्याचबरोबर काही लोक गाड्यास जुपलेले बैल पळण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. मोठ्यासंख्येने दुचाकी ही त्याठिकाणी होत्या. पोलीस आल्याचे पाहताच काही लोकांनी आपल्या बैलगाडासह तेथून पोबारा केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून १० बैलगाडीचे छकडे, १२ मोटारसायकल पिकप टँपोमध्ये भरुन नीरा पोलिस स्टेशनला जमा केले आहेत. अशी माहाती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक यांनी नीरा येथे दिली.