सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सार्वजनिक बांधकाम विभागाने करंजेपुल ( ता.बारामती) येथील मुख्य चौकात असलेली अतिक्रमणे गुरुवारी(दि.२९) रोजी पोलिस बंदोबस्तात हटविली. याठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून शासकीय जागेत व्यवसायिकांनी अतिक्रमण केले होते. अतिक्रमणे हटविल्याने येथील चौकाने मोकळा श्वास घेतला असून वारंवार होणारी गर्दीही कमी होणार आहे. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी ३० जूनला अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने पाच दुकानदारांवर कारवाईचा बडगा उभारला.
गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यंत्रसामग्री आणि वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे अधिकारी - कर्मचारी यांनी याठीकाणी असलेली फळविक्री, बॅटरी, खाद्यपदार्थ विक्री दुकाने, पानटपऱ्या आणि जनरल स्टोअर्स आदी दुकानांवर कारवाई केली. अचानक येथील चौकातील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने बघ्यांची मोठी गर्दी याठीकाणी झाली होती. येथील व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारच्या नोटीस अथवा सूचना न देता अतिक्रमणे हटविण्यात आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आतापर्यंतचा इतिहास पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने निरा- बारामती या राज्यमार्गावरील वडगाव निंबाळकर, माळेगाव बुद्रुक येथील अतिक्रमणे हटविली होती मात्र सध्या येथील अतिक्रमणे जैसे- थे स्थितीत आहेत त्यामुळे येथील चौकातील अतिक्रमणे हटविली तरी पुन्हा ती होवू नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
.................
सार्वजनिक बांधकाम व पोलिस विभागाने कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देता अतिक्रमण काढले आहे. आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची आणि दुकानातील साहित्य काढण्यासही वेळ दिला नाही. त्यामुळे ऐन कोरोना परिस्थितीत आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दत्तात्रय खैरे- व्यवसायिक.
--------------
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या जमिनींवरील अतिक्रमण केले असेल त्यांना नोटीसा देणे गरजेचे नाही. शासकीय पातळीवर केंव्हाही अतिक्रमण काढता येते.
एम. बी. खोसे, शाखा अभियंता बांधकाम विभाग.