सुखद वार्ता ! वढाणेकरांना मिळणार जनाईचे पाणी : शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार

Admin
सुपे : सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
दीपक जाधव

वढाणे (ता. बारामती) येथील गावठाण तलावात जनाई योजनेचे पाणी सोडण्यासाठी जलवाहिन्यांच्या जोडणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. योजनेचे पाणी मिळणार असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ हटणार असल्याचे समाधान शेतकरी वर्गाने व्यक्त केले.
      रसिकलाल धारवाल फाउंडेशन यांच्या सीएसआर निधीतून सुमारे ३५ लाख खर्चाचे हे काम करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने हे काम मार्गी लागल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.
      येथील ग्रामपंचायतीचे सरपंच रामदास चौधरी, उपसरपंच विजय कौले, सर्व ग्रा. पं. सदस्य भानुदास चौधरी, शुभांगी ऐकावले, लक्ष्मी चौधरी, सुनिल चौधरी, पुनम लकडे, गंगूबाई लकडे, प्रगती चौधरी तसेच पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थांनी या कामाची पहाणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे यांनी या कामासाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले. तसेच दिवंगत अली बशीर शेख आणि भीमा दादा महानवर यांच्या शेतातून या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यात शेख यांचे मोठे क्षेत्र यासाठी व्यापले गेले आहे. येथील नुकसानग्रस्त शेती शासन पुन्हा व्यवस्थित करून देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
          वढाणे येथील ब्रिटीशकालीन गावठाण तलावात जनाई उपसा योजनेचे पाणी सोडण्याची ग्रामस्थांची जुनी मागणी होती. येथील काम पुर्णत्वास येत असुन जनाई योजनेच्या जलसिंचन योजनेचे पाणी वढाणे शिवारास मिळणार आहे. मात्र या तलावातुन उचल पाणी दिल्यास वढाणे परिसरातील बहुतांश शेती बागायती होईल यासाठी पाठबंधारे विभागाने परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी बोलताना केली. 
     येथील ग्रामपंचायत सदस्य सुनिल बाळासो चौधरी, ज्ञानेश्वर कौले, बी. आर. चौधरी, काशिनाथ चौधरी, मच्छिंद्र चौधरी, रामभाऊ लकडे, संतोष चौधरी, संतोष गोरे, सुरेश चौधरी, गणेश चौधरी, अर्जुन चौधरी, बाळासो भोंडवे आदींचे या योजनेकामी सहकार्य मिळाले. यावेळी राहुल चौधरी, दत्तात्रय चौधरी, नामदेव चौधरी, सचिन चौधरी आणि भाऊसाहेब भापकर  आदी उपस्थित होते. 
          येथे सुमारे ६०० मीटर लांब व बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. वढाणे तलावाची पाणी साठवणूक क्षमता चार दशलक्ष घनफूट असून, खोलीकरण केल्याने आत्ता या क्षमतेत दिड पटीने वाढ झाली आहे. येत्या आठवड्यात हे काम पुर्णत्वास येणार आहे. या तलावावरून वढाणे व कुतवळवाडी या दोन गावांसाठी नळपाणीपुरवठा होत असल्याची माहिती जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना उपविभाग दौंडचे उपविभागीय अभियंता आर. डी. भुजबळ यांनी दिली.
..............................................................

To Top