सोमेश्वर रिपोर्टर टीम------
येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या स्थापनेला यावर्षी ५० वर्ष पूर्ण होत असल्याने २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष 'सुवर्ण महोत्सवी वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे म्हणजेच 'अमृत महोत्सवी वर्ष' संपूर्ण देशभर साजरे केले जात आहे. या दोन्ही योगाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने 'भारतीय स्वातंत्र्य चळवळ: एक आकलन' या मुख्य संकल्पनेवर आधारीत तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला दि.१७ ते २० ऑगस्ट २०२१ या दरम्यान आयोजित केली होती.
दि.१७ ऑगस्ट रोजी, सदर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे येथील इतिहास विभागप्रमुख डॉ.गणेश राऊत यांनी गुंफले. त्यांनी 'भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील अज्ञात इतिहास' या विषयावर व्याख्यान देताना बॅ. विठ्ठलभाई पटेल,राजकुमारी अमृत कौर, चार्ल्स अँड्रीव्हज, आसफ अली, अरुणा आसफ अली, रामप्रसाद बिस्मिल, विल्यम जोन्स आणि चिदंबरम पिल्ले यांचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान स्पष्ट केले. तसेच इतिहास लेखकांनी दुर्लक्षित केलेल्या त्यांच्या भूमिकांबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले.
दि.१८ ऑगस्ट रोजी, व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पु.अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ.चंद्रकांत चव्हाण यांनी गुंफले. त्यांनी 'भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि महात्मा गांधी' या विषयावर व्याख्यान देताना महात्मा गांधींचे तत्वज्ञान, विविध आंदोलनातील त्यांच्या भूमिका आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांचे योगदान व महत्त्व याबाबत अभ्यासपूर्ण, चिंतनात्मक विचार मांडले.
दि.२० ऑगस्ट रोजी, व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ.किसन अंबाडे यांनी गुंफले. त्यांनी 'स्वातंत्र्योत्तर भारत' या विषयावर व्याख्यान देताना भारतीय स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या अनेक समस्या व आव्हानांचा उहापोह केला. तसेच सक्षम असणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे व लोकशाहीचे महत्त्व पटवून देणारे विवेचन केले.
समारोप मनोगतामध्ये सा.फु. पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.के.एल. गिरमकर यांनी मु. सा. काकडे महाविद्यालय आणि काकडे कुटुंबियांच्या सामाजिक-शैक्षणिक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले आणि महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रा.जयवंत घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी, सहसचिव श्री. सतीश लकडे यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेमध्ये प्रास्ताविक आणि परिचय अनुक्रमे इतिहास विभागप्रमुख डॉ. देविदास वायदंडे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.संजू जाधव, उपप्राचार्य डॉ. प्रविण ताटे देशमुख यांनी केले. डॉ. दत्तात्रय डुबल यांनी आभार व्यक्त केले. प्रा. दत्तात्रय जगताप यांनी सूत्रसंचालन तर प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी तांत्रिक संचालन केले.
या व्याख्यानमालेमध्ये राज्यातील विविध मान्यवर तर महाविद्यालयातील उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, विध्यार्थी वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.