२५ वर्षांपूर्वी पाटस येथे झाडाखाली टाकून दिलेल्या दोन दिवसाच्या बाळाचा निंबुतच्या 'माउली' ने केला सांभाळ : आज तो मोठा होऊन उचलतोय घराची जबाबदारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

घरची परिस्थिती हालकीची, रोज काम केलं तरच दोन वेळेचं खायला मिळायचं, त्यात पदरात चार मुली आणि एक मुलगा अशातच सौदा विकायला गेल्यावर रस्त्याच्या कडेला  टाकून दिलेलं दोन दिवसाच बाळ दिसलं...अगोदरच पाच मुलं पदरात असताना त्या सहाव्या बाळाचा स्वीकार त्या माउलीने केला. आज तो २५ वर्षाचा झाला असून घराची जबाबदारी उचलून त्या माऊलीचे पांग फेडत आहे. 
           बारामती तालुक्यातील निंबुत येथील अरविंद बामणे व सुमन बामने हे आपला पारंपरिक व्यवसाय असलेला सौदा विक्रीसाठी दौंड तालुक्यातील पाटस येथे गेले असता त्यांना रस्त्याच्या कडेला झाडाखाली एक दोन दिवसांच् बाळ टाकून दिल्याचे दिसले. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही, खायला सात हात असताना सुमन बामणे यांनी त्या बाळाचा स्वीकार केला. आणि त्याचे नाव नवनाथ ठेवले. सुमन आणि अरविंद यांनी स्वतःच नाव या बाळाला दिले. आज तो मोठा झाला आहे. १० वर्षापूर्वी त्याच लग्नही त्यांनी लावून दिलं आहे. आज नवनाथला दोन मुलं देखील आहेत. आज नावनाथ पडेल ते काम करून घराची जबाबदारी उचलत आहे. त्याचे परिसरातून कौतुक होत आहे. 
       सुमन अरविंद बामने या २५ वर्षापासून नवनाथला सांभाळत आहेत सुमन यांचे घरची परिस्थीती अत्यंत गरीबीची असतांना देखील उदार अंतकरणाने या माऊलीने
स्वतःच्या चार मुली व एक मुलगा असतांनाही या अनाथ मुलाची जबाबदारी स्विकारुन फार मोठे सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांनी गरीबीतून माणुसकीचे दर्शन दिलेले आहे. 
         आज बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुमन बामणे यांचा सत्कार केला आहे. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.  यावेळी अजित पवार यांनी बामणे कुटुंबावर कौतुकाची थाप टाकून या कुटुंबाला घरकुल देणार असल्याचे सांगितले.
To Top