कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतकरी आक्रमक : सुपे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकर्‍याचे ठिय्या आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपाची वीज खंडित केल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बारामती तालुक्यातील सुपे येथील महावितरणच्या उपकेंद्र समोर ठिय्या आंदोलन केले. वीज पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. 
           एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतीत असताना दुसरीकडे महावितरणने कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता अचानक कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यासाठी ट्रांसफार्मरचा विज पुरवठा खंडित करण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत. त्यानुसार सुपे परगण्यातल्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मात्र, वीज बिलाची सवलत मिळावी, तसेच विज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय असावी, या मागणी भाजपा नेते  दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज सुपे येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या संदर्भात बोलताना खैरे म्हणाले, आधीच कोरोना मुळे लोकांचे रोजगार ठप्प आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव मिळेना, पावसाने देखील या भागात दडी मारलेली आहे, अशी विदारक परिस्थिती असताना महावितरणने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता सरसकट वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. वास्तविक, शेतकऱ्यांना सूचना देऊन बिल भरण्यासाठी सवलत आणि सुलभ हप्ते करून देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे अपेक्षित होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. मुजोर अधिकारी सरसकट ट्रांसफार्मर चा वीज पुरवठा खंडित करीत आहे. त्यामुळे आणि सुपे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत याबाबत महावितरण योग्य तोडगा काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
To Top