सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
ज्या कारखान्यात सहाशे-सातशे कामगार होते तिथे सत्तर कामगार राहिलेत. बाकीचे सगळे ठेक्याने घेतात. इथले लोक प्रदूषण सहन करत आहेत. आसपासच्या गावातील दीड हजार सुशिक्षित मुलांचे अर्ज गोळा करणार. त्यांना घेऊन गेटवर येणार. त्यांना कायम सेवेत घ्या. अन्यथा १५ सप्टेंबरपासून हजारो लोक कंपनीच्या गेटवर आंदोलन करतील, असा इशारा राष्ट्रीय श्रमिक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिला.
नीरा (ता. पुरंदर) येथे ज्युबिलंट कामगार युनियनच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बी. जी. काकडे यांच्या हस्ते यशवंत भोसले यांचा राष्ट्रीय श्रमिक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक बी जी काकडे, दत्ता चव्हाण, विक्रम काकडे, अजित जगताप, शशिकांत काकडे, विजय काकडे, धैर्यशील काकडे, राजेंद्र काकडे, अजित काटे, सुनिल कोंडे, दिलीप अडसूळ, प्रवीण जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी भोसले म्हणाले, स्थानिकांना रोजगारनिर्मिती व्हावी म्हणूनच सरकार कंपन्यांना पायघड्या घालतं. १९६८ साली केंद्रसरकारने केलेल्या कामगार कायद्यानुसार कंपन्यांनी ऐंशी टक्के स्थानिक लोक नोकरीला घ्यावेत असा कायदा केला आहे. राज्यात सर्वात जास्त उद्योग आहेत. शिवसेना भूमिपुत्रांच्या मुद्द्द्यावर उभी राहिली. आज उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, आम्ही सत्तेत असूनही उद्योगपती स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देत नसतील तर आम्हाला गंभीर परीणाम भोगावे लागतील. प्रत्येक तालुक्यात कारखाने आलेत परंतु गावोगावचे पुढारी, सरपंच कंपनीकडे ठेका मागण्यात धन्यता मानतात. प्रत्येक गावच्या सरपंचाला सांगायचं आहे तुमच्या एका मुलाला ठेका मागू नका तर माझ्या गावातील सगळ्या पोरांना कायम कर अशी मागणी उद्योगपतीकडे करू नका. स्वतःचीच तुंबडी भरतात.
ज्युबिलंट कंपनीच्या प्रदूषणाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दोन वर्षापूर्वी विषारी वायू गळतीमुळे दोन माणसांचा मृत्य झाला कित्येक जखमी झाले. पण चार लोकं गप्प करून अधिकारी अधिकारी एसी लावून बसतात. लोकांना दुर्गंधी सहन करायला लावतात. जे काम सतत चालू असते त्या कामात कंत्राटी पध्दत लागू होत नाही. असे असतानाही नव्वद टक्के काम कंत्राटी पध्दतीवर चाललं आहे. इथले कंत्राटी परवाने बंद करावेत अन्यथा कंपनीचे नोंदणीपत्र रद्द करावं अशी सरकारकडे मागणी केली आहे. पंचक्रोशीतील लोकांचा कंपनीच्या नोकरीवर पहिला अधिकार आहे. प्रत्येक घरात शिकलेली मुले आहेत. त्यांना नोकरी मिळण्यासाठी इथल्या लोकांनाही ही लढाई लढावी लागेल. कायम नोकरीसाठीच्या लढ्यात सहभागी व्हा. दीड हजार मुलांचे अर्ज तयार करून घ्या त्यांच्या मुलाखती कंपनीने लावल्या पाहिजेत.
सस्पेंड केलेल्या लोकांना पुन्हा कामावर घ्या. अध्यक्ष मीच आहे. तसे पत्रही आहे. पण कंपनीच्या सहकार्याने विरोधकांनी बच्चू कडूंमार्फत अधिकाऱ्यांना झापलं. आजही अध्यक्ष मीच आहे व कमीटीही माझीच कायदेशीर आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच ते म्हणाले तीनशे कामगार असतील तर तो कारखाना बंद करू शकतो असे नव्या कामगार कायद्यात म्हटले आहे. त्या ४९ कायद्यांचे चार कोड तयार केले आहेत. काही संघटनांनी कोडला विरोध केल्याने तूर्तास कोडला स्थगिती मिळालेली आहे. चार महिने त्यावर निर्णय होणार नाही.
प्रस्ताविक रमेश जेधे यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब बारवकर यांनी केले तर आभार शिवाजी लोखंडे यांनी मानले.