सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोरोनामुळे आजही कुलूपबंद शाळा असल्याचा फायदा घेत तीन ते चार इसमांनी सांगवी (ता. बारामती ) येथील जिल्हा परिषद शाळेतील किचनशेडचे कुलूप तोडून शटर उचकटून जवळपास ३० ते ३५ हजार रुपयांच्या वस्तूंची चोरी करून मालमत्तेचे मोठे नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि.२ ) रोजी हा प्रकार घडून आला. याबाबत माळेगाव पोलीस स्टेशन येथे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे.
शाळेच्या गेटवरून चढून आत प्रवेश करत चोरी करताना या इसमांनी सीसीटीव्ही केमेरे फिरवत त्याच्या केबल वायरी कापून टाकल्या आहेत. तर जुन्या वर्ग खोल्यांचे दरवाजे दगडाने ठेचून तोडले आहेत. तर खुर्च्या,ढोल ताशे अंगणवाडीच्या परिसरातील टॉयलेट बाथरूम मध्ये टाकून देण्यात आले आहे. असे विद्रुपीकरणामुळे जिल्हा परिषद शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शाळेत इसम शटर उचकटत असताना काही ग्रामस्थांनी चोरी करणाऱ्या तरुणांना पाहिले असल्याचे शिक्षकांना माहिती दिली. यावेळमुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती व गावातील पदाधिकारी यांनी घटना स्थळी पहाणी केली. दरम्यान काही पदाधिकार्यांनी गावातीलच तरुण असल्याने त्यांना बोलावून घेऊन मिटवून घेण्याची भूमिका ठेवली होती. मात्र ,शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक पोलिसांत तक्रार करण्यावर ठाम राहिले.
सोमवार (दि. २ ) रोजी संध्याकाळी शाळेच्या किचनशेडचे शटर उचकटून यामध्ये गेसची टाकी,स्वयंपाकाची लोखंडी शेगडी,२०० ताटे,१५ डिश या साहित्यांची चोरी करण्यात आली आहे. सध्या शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा कुलूपबंद आहेत. याचाच फायदा घेत सांगवी गावातीलच काही तरुणांनी संधीचा फायदा उचलत साहित्यांची चोरी करत शासकीय मालमत्तेचे नुकसान करत विद्रुपीकरण केल्याचा प्रकार अनेकांनी प्रत्यक्षदर्शी पाहिला. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारावर स्मार्ट शिक्षण देणाऱ्या सांगवीच्या शाळेची राज्यपातळीवर दखल घेऊन आदर्श यादीत निवड करण्यात आली होती. तर मागील काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात सांगवीच्या जिल्हा परिषद शाळेची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. समाजकंटकांनी असे कृत्य करणे अशोभनीय आहे. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.