सुपे : प्रतिनिधी
दीपक जाधव
बाबुर्डीत अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडुन सुमारे पाच तोळे सोने व रोख आठ हजाराची रक्कम सुऱ्याचा धाक दाखवुन लंपास केल्याची घटना शुक्रवारी ( दि. २० ) मध्यरात्रीला घडली.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार बाबुर्डी येथील माणिक नारायण बाचकर यांच्या घरातील कपाटातील मंगळसूत्र, कानातील रिंगा, पायातील पट्टया असे ३ तोळ्यांचे दागिने आणि रोख आठ हजार रुपये, तर शेजारील सुमन बाचकर यांचे मंगळसूत्र आणि कानातील फुले मिळुन २ तोळ्यांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सुमन रामभाऊ बाचकर यांच्या गळ्याला सुरा लावून ‘गप्प बस नाही तर, डोक्यात सुरा घालून जाग्यावरच खल्लास करून टाकीन’ असा सज्जड दम देत गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने, मोबाईल काढून घेतले. हा दरोडा टाकताना कोणी शेजारील बाहेर येवु नये यासाठी चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्या होत्या.
तसेच शेखर बाचकर यांच्या घरातील कपाटातील समान अस्ताव्यस्त टाकून दिले पण तिथे त्यांच्या हाताला काही लागले नाही.
पहाटेच्यावेळी बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे आणि पोलीस पाटील वनिता लव्हे यांनी सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक सलिम शेख यांच्याशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. यावेळी पहाटेच्या वेळी काही क्षणातच सलिम शेख आणि हवालदार माहुरकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. तसेच गावाच्या शेजारी आजूबाजुला राहणाऱ्या संशयितांच्या वस्तीवर जाऊन तातडीने तपास केला, मात्र काही संशयास्पद आढळुन आले नाही.
दरम्यान सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, काही संशयीत काळ्खैरेवाडी येथील एका ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचे त्यानी सांगितले.
.................................................