सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारी घेतानाचे चित्रीकरण व्हावे तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रे लवकरात लवकर निश्चित करावी अशी मागणी भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलचे प्रमुख दिलीप खैरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलीप खैरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमेश्वर सह साखर कारखाण्याची निवडणूक प्रक्रिया दि.२०/९/२०२१ पासून पुन्हा सुरू झाली आहे. या प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया दि.२०/९/२०२१ ते दि.४/१०/२०२१ या दरम्यान होणार असून एकूण आलेले उमेदवारी अर्ज व आज अखेर सुरू असलेली प्रक्रिया पहाता शेवटच्या कालावधीत खुप गर्दी होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे काही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज माघारी घेताना यांचे परस्पर अर्ज घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच यापूर्वी काही निवडणूक प्रक्रियेमध्ये एक गठ्ठा अर्ज माघारी साठी दाखल करून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, तरी या सर्व बाबींचा विचार करता उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी कायदेशिर व ध्वनीचित्रीकरण (इन कॅमेरा) व्यवस्था करूनच ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात यावी, जेणे करून या बाबत वाद निर्माण झाल्यास न्यायालयीन प्रक्रिया व योग्य न्याय देण्यासाठी सदर बाबीची गरज राहील.
तसेच या प्रक्रियेतील मतदान ही प्रक्रिया अत्यंत महत्वपूर्ण असून कारखान्याचे कार्यक्षेत्र, मतदार संख्या, भौगोलिक परिस्थिती व प्रक्रियेतील कालावधी पहाता मतदान केंद्राची संख्या व जागा लवकरात लवकर निश्चित केल्यास उमेदवार व मतदार यांना मतदाना बाबत जणनागरण व समन्वय करण्यासाठी सदरची केंद्राची संख्या मतदारांना जास्तीत जास्त सोयीचे व तातडीने घोषित केल्यास सोईचे होईल तरी सदरच्या केंद्राची संख्या व जागा घोषित करून त्यांची यादी मिळावी अशी मागणी खैरे यांनी केली आहे.
दिलीप खैरे - प्रमुख सोमेश्वर परिवर्तन पॅनेल
सर्वसामान्य ऊसउत्पादक सभासद मतदारांना मतदान करताना सोयीचे मतदान केंद्रे उपलब्ध व्हावीत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व दबाव विरहित व्हावी यासाठी प्रशासनाला साकडे घातले आहे.