सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पाचगणी : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मिनी काश्मिर असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्याला जोडणारा पसरणी घाट अपघाताला निमंत्रण देत आहे. या घाटातील रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे प्रवाशांना आता जिकिरीचे होत आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात अपघाताला सामोरे जावे लागत असून पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी मेटाकुटीला आला आहे.
हरीसन फॉली ते दत्त मंदिर, नागेवाडी फाटा, बुवासाहेब मंदिर, या परिसरात खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात तर वाहन चालवणे बिकटच होत आहे खड्ड्यात पाणी साचल्याने प्रवाशांना अंदाज न आल्याने गाडी खड्ड्यात जाऊन गाडी अपघात होत आहेत. गाड्यांचे नुकसान ही होत आहे . त्यातच गेल्या पावसाळ्यात संरक्षक भिंत कोसळल्याने रस्ता धोकादायक झाला होता. बांधकाम विभागाने संबंधित संरक्षक भिंत बांधली मात्र त्याठिकाणीच्या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केल्यामुळे आता खड्डे पडले आहेत. गेल्याच महिन्यात घाट पूर्ण बंद करून मोऱ्यांची कामे केली आहेत. मात्र त्या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करून घाटातील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत. हा रस्ता नेमका पावसामुळेच खराब झाला की दर्जाहीन कामामुळे हा प्रवाशांना प्रश्न पडला आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर रस्ता दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त बांधकाम विभागाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या पाचगणी, महाबळेश्वर, भिलार, तापोळा या पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी पर्यटकांची रहदारी वाढली आहे. त्यातच पुढील महिन्यात पर्यटन स्थळांवरील शाळा, महाविद्यालये सुरू होणार असल्याने निवासी शाळातील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची ये-जा सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांनाही या रस्त्यावरील खड्ड्यांना सामोरे जावे लागणार असून नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तरी बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे.
पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील नागरिकही वाई, पुणे, साताराकडे नेहमी जात असतात. या लोकांनाही हा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्त करण्यासाठी जाग कधी येणार, असा प्रश्न प्रवासी करीत आहेत. एखादा अनर्थ घडण्याअगोदर रस्ता दुरुस्त करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पर्यटकांसह नागरिक करत आहेत. बांधकाम विभागाने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.