सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चोपडज (ता. बारामती ) येथील शेतकरी कृती समितीची मुलुख मैदानी तोफ प्रा. बाळासाहेब जगताप व सरपंच पुष्पलता जगताप यांनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. शेतकरी कृती समितीचा एक मोहरा यानिमित्ताने गळाला आहे.
मराठीचे प्राध्यापक प्रा. जगताप हे सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीचे सोळा वर्ष प्रमुख आणि प्रामाणिक कार्यकर्ते मानले जात होते. 2007 च्या सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ते अल्प मतांनी पराभूत झाले होते. विरोधी गटातून अनेक संधी खुणावत असतानाही कृती समितीची कास सोडली नव्हती. दरम्यान मागील वर्षी गावात सर्वपक्षीय आघाडी करून करून चोपडज ग्रामपंचायतीत सत्ता हस्तगत केली. सरपंचपदी त्यांच्या पत्नी व माध्यमिक शिक्षिका पुष्पलता जगताप झाल्या. यानंतर विकास कामांच्या अनुषंगाने त्यांची संभाजी होळकर, बापू धापटे या राष्ट्रवादी नेत्यांशी जवळीक वाढली होती. यातूनच अखेर या जगताप दाम्पत्याने आज शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष देविदास जगताप, भाजप कार्यकर्ता मारुती कोळेकर या प्रातिनिधिक कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती बापू धापटे, सुनील खलाटे, उपसरपंच तुकाराम भंडलंकर , चोपडज सोसायटीचे माजी अध्यक्ष बबन निकम, निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र भंडलंकर आदी उपस्थित होते.
सोमेश्वर कारखाना निवडणुक पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पवार यांनी विकास कामांच्या उद्घाटनसाठी गावात येण्याचा शब्द दिला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव जिल्ह्यातील विकासाचे मॉडेल म्हणून उभे करण्यासाठीच पक्षप्रवेश केला आहे, असे सरपंच जगताप यांनी सांगितले