राजहंस पतसंस्थेचा आठ टक्के लाभांश तर भिगवण येथे होणार संस्थेचे भव्य कार्यालय : वार्षिक सभेत निर्णय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

करंजेपूल (ता. बारामती) राजहंस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत आठ टक्के लाभांशवाटप करण्याचा तसेच भीगवण (ता. इंदापूर) येथे कार्यरत असलेल्या शाखेसाठी जागाखरेदी करून इमारत बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला. 
पुणे व सातारा जिल्ह्यात करंजे मुख्य कार्यालयासह वडगाव, भिगवण, बारामती, सुपे, पाटस, जेजुरी, शिरवळ, हडपसर अशा आठ शाखांमध्ये राजहंस पतसंस्थाचे साडेआठ हजार सभासद आहेत. या राजहंस पतसंस्थेची वार्षिक सभा अध्यक्ष मधुकर सोरटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी संचालक आत्माराम सोरटे,  कृष्णा सोरटे,  दत्तात्रेय वायाळ, नामदेव शेंडकर, बापूराव सोरटे, सोमनाथ भांडवलकर, मनोज मुनोत, राजेंद्र शिंदे, लिनता शहा आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक करताना कार्य़कारी संचालक विजयकुमार सोरटे यांनी, 'संस्थेचे भागभांडवल १५ कोटी रूपये व निधी 22 कोटी असून ठेवी अल्पावधीतच १७५ कोटींवर तर कर्जवाटप १३७ कोटींवर गेले असल्याची माहिती दिली.' दरम्यान, मागील वर्षी रिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे लाभांश देता आला नव्हता. त्यामुळे यावर्षी कोरोनाकाळ असतानाही समाधानकारक लाभांश द्यावा अशी मागणी सभासदांनी चर्चेत केली. यावर आठ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. भीमराव बनसोडे, विलास शिंदे, डॉ. गिरीश तवटे या ज्येष्ठ सभासदांनी संस्थेने ३९ टक्के म्हणजे ७८ कोटी तरतुदी केल्याबद्दल तसेच सीडी रेशो ६८ टक्के तर एनपीए शून्य टक्के राखल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले. याशिवाय भीगवण शाखेच्या सभासदांच्या मागणीवरून स्वतंत्र जागा खरेदी करून इमारत उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभासदांचा चर्चेतील सहभाग लक्षणीय होता. सूत्रसंचालन उपव्यवस्थापक रामचंद्र शेंडकर व मुख्य लेखापाल शिवाजी सोरटे यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष विलास शेंडकर यांनी मानले.
---
To Top