आनंदवार्ता ! सोमेश्वरनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र 'विशेष बाब' म्हणून  मंजूर करण्यात आले आहे. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काढण्यात आला आहे. या आरोग्य केंद्राचा फायदा सोमेश्वरनगर परिसरातील  गावांना तसेच सोमेश्वर कारखाना तळावरील ऊसतोडणी कामगारांना होणार असून होळ या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील भार यामुळे आता हलका होणार आहे. 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे व 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या माध्यमातून आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने  मागणी करण्यात आली होती. परिसरातील गरज ओळखून अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास जागा उपलब्ध करून देण्यास सांगितली होती. त्यानुसार सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि संचालक मंडळाने संचालक मंडळाच्या सभेत मंजूरी घेऊन आरोग्य केंद्रासाठी दीड एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.
         प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत,ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड,पांडुरंग भोसले, तुषार सकुंडे यांनी पाठपुरावा  केला होता.
             सोमेश्वरनगर, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, निंबुत, करंजेपूल, खंडोबाचीवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, चौधरवाडी, मगरवाडी, करंजे, देउळवाडी तसेच वाड्यावस्त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. 12 गावांचा समावेश असून 35183 इतक्या लोकसंख्येच्या नागरिकांना यामुळे आरोग्य सेवेचा फायदा होणार आहे.  तसेच वरील गावांच्या ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्राची मागणी करिता सहकार्य
केले होते. होळ येथील आरोग्य केंद्रावर सध्या मुख्य १९ गावांचा भार आहे. सोमेश्वरनगर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर होळ प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने नागरिकांना अंतरा अभावी जाणे शक्य होत नाही. या ठिकाणी आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांना आणि सोमेश्वर कारखाना तळावरील ऊसतोड हंगाम काळात जवळपास दहा हजार मजूरांना प्राथमिक उपचार घेता येणार आहे. सोमेश्वरनगर येथे आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने परिसरातील गावांतील रुग्णांसाठी ते वरदान ठरणार असून आरोग्य केंद्र होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती प्रमोद काकडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सोमेश्वरनगर मधील आरोग्य सुविधा सुरळीत होणार आहे. असे  ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड यांनी सांगितले.
To Top