सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा- बारामती या राज्य मार्गावर सर्वाधिक वाहतुकीचा ताण आहे. पर्यायाने रस्ता अरुंद आहे. ही गरज ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने पश्चिम भागात दोन ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. या रस्त्यालगत शाळा, महाविद्यालय , संस्था, साखर कारखाने व मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे या रस्त्यांवर कायमच प्रवाशांची वर्दळ असते. अनेकवेळा वर्दळीच्या ठिकाणी अरुंद असणाऱ्या रस्त्यामुळे वाहतूककोंडी चा सामना प्रवाशांना करावा लागतो तो टाळण्यासाठी प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करंजेपूल ते वाघळवाडी असा ७ मीटरचा असणारा रस्ता १० मीटर होणार आहे. साईटपट्या दुरुस्त करून दीड मीटर डांबरीकरण होणार आहे. याशिवाय ओव्हरला बीएम कार्पेट होणार आहे. अशाच स्वरूपाचा वडगाव निंबाळकर येथील ढेलेवस्ती ते वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या दरम्यानही रुंदीकरण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मोहन खोसे यांनी दिली.
करंजेपुल येथील काम सुरु झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. निरा- बारामती या ४० किलोमीटर अंतराची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहतुकीचा ताण मोठा आहे. हा रस्ता चारपदरी होणार होता. यासाठी सर्व्हेही करण्यात आला होता. झाडांची संख्या, पूल, घाट रस्ता आदी मार्गांबाबत पूर्ण माहिती गोळा करण्यात आली होती मात्र राज्यावर आलेले कोरोनाचे संकट कमी होत नसल्याने या रस्त्याचे काम रखडले गेले. अजूनही या रस्त्यावर जीवघेणे खड्डे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अध्येमध्ये या रस्त्याची डागडुजी करते मात्र ती कायमस्वरूपी नसल्याने रस्ता पुन्हा उखडला जातो यासाठी रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे.