सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची रखडलेली निवडणुक प्रक्रिया नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे सुपे परिसरातील जिरायती पट्टयातील किमान दोन उमेदवारांना राष्ट्रवादी कॉंग्रसच्या पॅनलमधुन संधी मिळण्याची मागणी सभासद शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र स्विकृत संचालक घेवुन बोळवण करु नये असा सुर शेतकरी सभासद वर्गातुन येत आहे.
जिरातयती पट्टयात सुमारे तीन हजार एकर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली आहे. मागिल काही वर्षाचा विचार करता ऐवढ्या मोठ्या प्रमाणात ऊसाच्या क्षेत्रात दोन वर्षात मोठी भरीव वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिरायतीभागाकडे लक्ष दिल्याने जनाई योजनेचे पाणी योग्य वेळी येत आहे. त्यामुळे जिरायती भागातील ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
तसेच दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर या भागातील दोन उमेदवारांना संधी मिळण्याची मागणी शेतकरी सभासद वर्गाने केली आहे. या भागातील उमेदवार असतील तर हक्काने त्यांच्याकडे अडचणी मांडून सोडवता येतील अशी माहिती सभासद शेतकऱ्यांनी दिली.
या जिरायती भागातील सुमारे २ हजार ३५० मतदार सभासद आहेत. मागिल पंचवार्षिक निवडणूकीत याच जिरायती भागातील सभासद शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पॅनल निवडुन आणण्यात महत्वाचा वाटा उचलला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने स्विकृत संचालक घेवुन बोळवण करु नये असा सुर शेतकरी सभासद वर्गातुन येत आहे.
त्यामुळे सुपे परिसरातील राष्ट्रवादीतील इच्छुक व पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. त्यामुळे बारामतीच्या जिरायती पट्टयातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
......................................................