सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
चोपडज ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान पुष्पलता बाळासाहेब जगताप यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका बारामती येथील दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर श्री. व्ही. बी. कांबळे यांनी काल फेटाळून लावली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की- चोपडज ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020/ 2021 दरम्यान पुष्पलता बाळासाहेब जगताप या त्यांचे पॅनलमधून सर्वाधिक 289 मते मिळवून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. व पुढे सरपंच म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आली.मात्र 66 मते मिळवून पराभूत झालेले श्री.इम्रान चाॅंद खान यांनी बारामती येथील दिवानी कोर्टात निवडणूक अर्ज दाखल करून पुष्पलता जगताप यांचे ग्रामपंचायत सरपंचपदाचे निवडीस आव्हान दिले होते.
सौ. जगताप या पूर्णवेळ माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्या एक शासकीय नोकर असल्याचे तसेच त्यांनी त्यांची स्थावर मालमत्ता घोषणापत्रात उघड न केल्याचे आरोप त्यांच्यावर निवडणूक अर्जात करण्यात आले होते.
या केसची अंतिम सुनावणी काल दिनांक 22/9/ 2019 रोजी करण्यात आली असून सौ. जगताप यांच्यावतीने अॅड. किर्ती कस्तुरे-गाढवे यांनी लेखी युक्तिवाद मांडला. त्यांचा युक्तिवाद व त्यांनी सादर केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य धरून मे. कोर्टाने श्री.खान यांचा निवडणूक अर्ज फेटाळून लावला.
दरम्यान सौ.जगताप यांचेविरुद्ध पंचायत समिती बारामती, जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे विविध खोट्या तक्रारी करण्यात आल्या तसेच काही फौजदारी गुन्हे दाखल करून चारही बाजूंनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु या निकालाने वरील सर्व बाबींना शह मिळाला आहे.
याबाबत सरपंच सौ. जगताप यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या," हा अखेर सत्याचाच विजय असून आम्ही मे. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयामुळे इथून पुढे शासकीय पदे भूषवून समाजाची सेवा करण्यासाठी शिक्षकांनी पुढे येण्याचा मार्ग खुला झाला आहे."
या केस मध्ये सौ जगताप यांचे वतीने अॅड. किर्ती कस्तुरे-गाढवे यांनी काम पाहिले तर त्यांना माजी आमदार अॅड. विजयराव मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. अॅड.प्रांजली पांढरे व अॅड. प्रतीक महामुनी यांनी सहकार्य केले.