उद्योगपती सर्रास कायदे मोडुन ठेकेदारी पद्धतीने कामगार भरून ठेकेदार पोसत आहेत : यशवंत भोसले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---------

कामगार कायदा आणि शासनाचा आदेश यानुसार कंपन्यांनी ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत घेणे व कायम करणे बंधनकारक आहे. मात्र उद्योगपती सर्रास कायदे मोडत आहेत. ठेकेदारी पद्धतीने कामगार भरून ठेकेदार पोसत आहेत. आता राज्य सरकारने कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रीय श्रमिक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिला. 
नीरा (ता. पुरंदर) येथे ज्युबिलंट कामगार युनियन व श्रमिक आघाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बी. जी. काकडे होते. याप्रसंगी दत्ताजी चव्हाण, गोरख निगडे, विजयराव काकडे, विलास काकडे, संभाजी काकडे, शशिकांत काकडे, धैर्यशील काकडे, टी. के. जगताप, रमेश जेधे, अनिल कोंडे, प्रवीण जाधव, दुष्यंत चव्हाण, योगेश निगडे उपस्थित होते.
यानिमित्ताने ज्युबिलंट कंपनीपुरती स्थानिक रोजगार हक्क समिती स्थापन करून बी. जी. काकडे याना अध्यक्ष नेमण्यात आले.
भोसले म्हणाले, उद्योग व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार स्थानिकांना रोजगार मिळतो की नाही याची अंमलबजावणी करण्यासाठी विकास आयुक्त यांच्यासह नऊ जणांची शासकीय समिती आहे. पण 2008 पासून यांनी एकही बैठक घेतली नाही. कंपन्यांची पडताळणी केली नाही आणि आदेशही दिले नाहीत ही शोकांतिका आहे. शिवसेना भूमीपुत्रांसाठी लढते त्यामुळे आता अपेक्षा आहेत. नीरा येथील ज्युबिलंट कंपनीत नव्वद च्या दशकात तीन प्लांटमध्ये सहाशे कायम कामगार होते आता पाच प्लान्टमध्ये सत्तर कायम कामगार आणि बाकी सर्व कंत्राटीच आहेत. कंपनीने त्वरित कंत्राटी कामगारांना कायम करावे आणि ऐंशी टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या द्याव्यात अन्यथा संघर्ष अटळ आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक कंपनीच्या कार्यक्षेत्रात स्थानिक पुढाऱ्यांनी ठेका न घेता स्थानिक रोजगार हक्क समिती स्थापन करावी. त्यामार्फत स्थानिकांना कायम नोकरी मिळावी यासाठी संघर्ष करावा. राष्ट्रीय श्रमिक आघाडी प्रत्येक ठिकाणी सहकार्य करेल, असे आवाहन यशवंत भोसले यांनी केले.
---
To Top