सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यातील सरकारने एफआरपीची रक्कम अडीच वर्षांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. ऊस अठरा महिन्यांनी तुटणार आणि राज्यसरकारच्या म्हणण्यानुसार एक वर्षांनी बिल मिळणार. राज्यसरकारने साठ टक्के रक्कम चौदा दिवसात, वीस टक्के हंगाम संपल्यावर व वीस टक्के दिवाळीला अशी शेतकरीविरोधी शिफारस केली. हा कुटील डाव खासगी साखर कारखान्यांच्या हितासाठीच आखला होता. यात खासगीचे व्याज वाचणार होते आणि वर्षभर पैसे वापरायला मिळणार होते. म्हणूनच केंद्रसरकारने एकरकमी एफआऱपीचा लेखी आदेश काढून हा डाव मोडून काढला आहे. पण यामुळेच राज्याच्या सत्तेत बसलेल्यांचा बुरख्याआडचा चेहरा उघड झाला आहे. म्हणूनच सत्तापरीवर्तनासाठी पॅनेल टाकला आहे आणि होय ते शक्य आहे, असे आव्हान दिलीप खैरे यांनी दिले
काल सायंकाळी वडगाव निंबाळकर तर आज कोऱ्हाळे बु. भाजप पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रशांत सातव, अॅड. जी. बी. गावडे, युवराज तावरे, इंद्रजित भोसले, खलील काझी, शंकर दडस, हनुमंत शेंडकर, गणपत होळकर, आदिनाथ सोरटे, बबलू सकुंडे उपस्थित होते.
खैरे म्हणाले, केंद्राने इथेनॉलचे शेतकरीहिताचे धोरण राबविल्यामुळे दोन तीन टक्के इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण आता दहा टक्केवर गेले आहे. ते वीस टक्केवर नेण्याचे धोरण आहे. साखरेची निर्यात असो किंवा साखरेला किमान भाव ठरवून देणे असो हे निर्णय साखर कारखानदारीला महत्वाचा आधार ठरले आहेत. निती आयोगाने एफआरपीचे तीन तुकडे करण्याची शिफारस केली तरी त्याविरोधात केंद्रसरकारने कौल दिला आहे. याउलट राज्याची वागणूक आहे. राज्याच्या सत्तेत खासगी साखर कारखानदारीचे समर्थक बसले आहेत. खासगीला फायदा व्हावा म्हणूनच एफआरपीचे तीन तुकडे केले. साठ टक्के रक्कम चौदा दिवसात, वीस टक्के हंगाम संपल्यावर आणि वीस टक्के दिवाळीला. म्हणजेच ऊस तुटल्यावर एक वर्षांनी एफआरपी मिळणार हा प्रचंड मोठा अन्याय आहे. अशा अन्यायकारक सत्तेच्या विरोधात सोमेश्वर परिवर्तन पॅनेल बदलाच्या लढाईत उतरले आहे. आणि होय हे शक्य आहे.
पी. के. जगताप म्हणाले, माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती हे तिन्ही कारखाने एकाच नेतृत्वाखाली असल्याने शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. सोमेश्वर जर विरोधकांच्या ताब्यात शेतकर्यांनी दिला तर तिन्ही कारखान्याच्या सभासदांचा फायदा आहे. कारण खासगीच्या हितासाठी या एकाच नेतृत्वातील कारखान्यांनी ऐंशी वीस चा फॉर्म्युला काढला आहे तो बेकायदेशीर आहे. त्यामुळे खासगी कारखान्यांना स्वस्तात ऊस मिळतो. माळेगावच्या कारभाऱ्यांनी आधी स्वतः चांगला भाव द्यावा आणि मगच सोमेश्वरच्या सभासदांना प्रचारात शिकवायला यावे अशी टिकाही त्यांनी केली. निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल पिसाळ यांनी प्रस्ताविक केले तर भगवान माळशिकारे यांनी आभार मानले.