सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सदस्य आणि ग्रामस्थ त्यांच्या अनुपस्थितमुळे तहकूब करण्याची नाचक्की ओढवली आहे. विशेष बाब म्हणजे १४ सदस्यांपैकी सरपंच आणि उपसरपंच वगळता एकही सदस्य या ग्रामसभेला उपस्थित राहिला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काल विरंगुळा जेष्ठ नागरिक भवन या ठिकाणी सकाळी ११ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच स्मिता काकडे, उपसरपंच संजय जगताप हे वगळता उर्वरित १२ सदस्य या ग्रामसभेला हजर नव्हते. तसेच ग्रामस्थांचा देखील कोरम पूर्ण न झाल्याने ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली होती. कोविड काळात एकही ग्रामसभा घेण्यात आली नव्हती. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेला देखील सदस्यांनी पाठ फिरवली आहे. तसेच गेली सहा महिने मासिक सभा सभा देखील सदस्यांच्या कोरम अभावी तहकूब करावी लागत आहे. सदस्यांना गावाच्या विकासासाठी हातभार लागावा म्हणून ग्रामस्थांनी त्यांना या पदावर बसवले आहे. जे सदस्य गावाचा विकास सोडून स्वतःचा विकास करण्याकडे जास्त लक्ष देत आहेत अशा सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी युवा ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासक नेमावा : ग्रामस्थांची मागणी
ग्रामसेवक व सदस्य यांच्यात समन्वय अभाव असल्याने विकास कामांना खीळ बसत आहे. त्यामुळे गेली सहा महिने मासिक सभेला अनुपस्थित राहणारे सदस्य तसेच ग्रामसभेला अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी राजीनामा द्यावा व ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.