सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
दिवाळी सणानिमित्त कामगारांना बोनस देण्याची प्रथा आहे. मालकाकडून स्वखुशीने कामगारांना बोनस दिला जातो. मात्र, दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणून औरंगाबादमधील एका कामगाराने मालकाला बेदम मारहाण करत दात पाडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री चिकलठाणा एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळीचा बोनस नंतर देतो असे म्हणणार्या भिमा चंद्रदेव जोशी (वय ५०, रा.उत्तरानगरी, ब्रिजवाडी) या लेबर कॉन्ट्रक्टरला मजूराने शिवीगाळ करून बदडले. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील उत्तरानगरी येथे घडली. बाळू पठारे (रा.गांधीनगर, ब्रिजवाडी) असे लेबर कॉन्ट्रक्टरला मारहाण करणार्या मजूराचे नाव आहे.
आरोपी बाळू पठारे याने मालक भीमा जोशी यांना बोनसची मागणी केली, पण जोशी यांनी आता पैसे नाहीत. नंतर बोनस देतो, असे सांगितले. त्यावर बाळूला राग अनावर झाला व त्याने जोशी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. बाळूनं जोशी यांच्या तोंडावर ठोसा लगावला, यामध्ये जोशींचे दात पडले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शेख अफसर करीत आहेत.
COMMENTS