बारामती ! डोर्लेवाडी येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार : तर एक मुलगी गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
डोर्लेवाडी : प्रतिनिधी

डोर्लेवाडी ( ता.बारामती ) डोर्लेवाडीमध्ये सध्या मोकाट कुत्र्यांची चांगलीच दहशत पसरली आहे. व एका चिमूकलीचा देखिल मोकाट कुत्र्याने चावा घेतलेला आहे. ज्यामध्ये हि लहान मुलगी जखमी झाली आहे. घरासमोर खेळत असलेल्या 4 वर्षीय माहीच्या कंबरेला व पायाला कुत्र्याने चावा घेतला.
          आज ५ शेळ्यांचा चावा घेऊन शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत या घटनेने परीसरात भीतीचे वातावरण आणि चिंता व्यक्त होत आहे. गावामध्ये ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, अतिरेकी श्वानप्रेमी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला डोर्लेवाडीकरांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना आता या परिसरात घडू लागल्या आहेत तरी ग्रामपंचायत याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी गावामध्ये होऊ लागली आहे.गल्लोगल्ली टोळ्याटोळ्यांनी फिरणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या या कुत्र्यांच्या समस्येबद्दल घेतलेला हा आढावा
अपघातांचे प्रमाण वाढले डोर्लेवाडी व परीसरात कचऱ्याच्या साम्राज्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते. कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे. रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडलेल्या आहेत. कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणार कचरा, त्यातील पदार्थ, मासांचे तुकडे, हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य उपलब्ध होत असल्याने परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात. डोर्लेवाडीत सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या २०० ते २५० वर भरेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
डोर्लेवाडी गावांच्या परिसरात शेती ही चांगल्या प्रकारे पिकते. या गावांच्या बहुतांशी रस्त्यावर नॉनव्हेज खाद्यपदार्थ मिळत असतात त्यामुळे कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. तसेच गोठ्यांच्या भोवताली कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसते. वाढलेल्या प‌िकांमध्ये कुत्र्यांचा मोकाट वावर होत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. पाणी दिलेल्या पिकांच्या शेतात गारव्याला बसण्यासाठी येणाऱ्या या कुत्र्यांमुळे पिके तुडविली जात आहेत.

-----------------
डोर्लेवाडी परीसरात कचरा साचणाऱ्या रस्त्यांवरच्या ठिकाणांवर हमखास मोकाट कुत्री दिसतात. कुत्र्यांची संख्या वाढण्यास रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे हे प्रमुख कारण आहे. या कचऱ्यात खाद्यपदार्थही असल्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य मिळत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर टाकणे बंद केल्यास कुत्र्यांच्या संख्येवर निश्चित आळा बसू शकेल व मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रामभाऊ बनकर ग्रामपंचायत सदस्य डोर्लेवाडी
------------------
सकाळी ७ ते १० आणि रात्रीच्या वेळी या मोकाट कुत्र्यांचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वेळेत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्याच फिरत असतात. त्यामुळे सकाळी फिरायला, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडणारे व लहान मुले, वृध्द, महिला, मोटारसायकल चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा कुत्रे पाठलाग करून चावा घेतात. शिवाय परिसरातील अनेक लोकांना चावा घेतला आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
शिवाजी गाडे स्थानिक रहिवासी डोर्लेवाडी
   -------------------
माझी मुलगी खेळत असताना अचानक तीन चार कुत्री आले आणि त्या कुत्र्यांनी तीचावर चावा घेतला जर माझ्या मुलीला आज काय झालं असतं याला जबाबदार कोणाला धरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, अतिरेकी श्वानप्रेमी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आम्हा डोर्लेवाडीकरांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
ग्रामस्थ - मल्हारी विठ्ठल गाडे डोर्लेवाडी
--------------------
 आमच्या परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. लहान मुलांना बाहेर खेळणे मुश्क‌िल झाले आहे. परिसरातून जाताना-येताना लहान मुले, वृध्द, महिलांना या कुत्र्यांची भीती असते.आणि आज या मोकाट कुत्र्यांनी आमच्या गोठ्यातील ५ शेळ्यांचा चावा घेतलेला आहे. माझे जवळपास ५० हजाररुपयांचे नुकास झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
 शेतकरी -  हरिदास बनकर डोर्लेवाडी
----------------------
डोर्लेवाडी परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल व गावकऱ्यांना होणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील .
सरपंच - पांडुरंग सलवदे डोर्लेवाडी 




To Top