सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ज्यांनी राज्यातील सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढून खासगी कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली तेच नेते अशतील तर भवितव्य कसे असेल असा असा सवाल महाराष्ट्र राज्य भाजप किसान मोर्च्याचे राज्याध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला.
करंजेपूल (ता. बारामती) येथे भाजप पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलची सांगता सभा आज जोरदार पाऊस कोसळत असतानाच पार पडली. याप्रसंगी इंद्रजित भोसले, सुशांत सोरटे, बाळासाहेब भोसले, गणपत होळकर, ऋषिकेश धसाडे, हनुमंत शेंडकर, शंकर दडस, आदिनाथ सोरटे, बजरंग किन्हाळे, नाना गायकवाड, सुशांत सोरटे, बबलू सकुंडे आदी उपस्थित होते. काळे पुढे म्हणाले, नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निविदा काढून बारा सहकारी साखर कारखाने चालवायला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सहकारी कारखाने ९५ वर आले आहेत आणि खासगी कारखान्यांची संख्या महाविकास आघाडीने ९५ वर नेऊन ठेवली आहे. सत्ताधाऱ्यांनी जे शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत असेच उमेदवार निवडले आहेत. आव्हान देऊ शकणारांना डावलले आहे. विरोधात पॅनेल टाकला म्हणून आज सगळे सभासदांच्या दारात जात आहेत आणि मेळावे घेत आहेत. परिवर्तन पॅनेलसोबत सभासदांची सुप्त लाट असल्याने परिवर्तन होणार हे निश्चित झाले आहे. लढणाऱ्या सतीश काकडेंना साथ दिली नसल्याने त्यांनी तलवार म्यान केली. सभासदांनी आता पुन्हा असे घडू देऊ नका.
सोमेश्वर परिवर्तन पॅनेलचे प्रमुख दिलीप खैरे म्हणाले, साखरवाडी कारखाना 'सोमेश्वर' शंभर कोटी रूपयांत खरेदी करायला तयार होता तरी तो दत्त इंडियाने सत्तर कोटीत कसा घेतला? नेतृत्व नेमके काय करत होते असा सवाल पुणे प्रादेशिक बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी केला. तसेच सोमेश्वर सर्व सेवा संघाच्या सव्वातीन कोटी रूपयांच्या गैरव्यवहारातील दोषींना सोडणार नाही असेही नेते म्हणत होते आज त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावत आहेत. या नेत्यांनी आपल्या खासगी कारखान्याच्या हितासाठी विस्तारीकरण लांबविल्याने शेतकऱ्यांचे पन्नास कोटींचे नुकसान झाले, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तसेच दोनशे कोटींच्या आसपास कर्ज असतानाही कारखाना कर्जमुक्त झाला अशी घोषणा सत्ताधारी नेतेमंडळी करत आहेत. जर कारखाना कर्जमुक्त असेल तर अख्खा पॅनेल मागे घेतला असता. पण सत्ताधारी रेटून खोटे बोलत आहेत, असा आरोपही केला. उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेकडे पाहून सभासदांनी नेहमी मते दिली. परंतु ती प्रतिमा राहिलेली नाही. बावन्न कोटींचा डिफर्ड खर्च सभासदांना आपल्या खिशातून भरावा लागला. सव्वातीन कोटीचा सर्व सेवा संघाचा गैरव्यवहार उघड झाला तोही सभासदांनी खिशातून भरला. या सगळ्यांवर कारवाई करण्याचा शब्द दिला होता तो नेतृत्वाने मोडला आहे. बेसल डोस व ऊस बेणे यातही घोटाळा झाला होता त्यावरही निर्णय झालेला नाही. साखरवाडी कारखाना खरेदी करू असे बोलले होते पण अचानक दत्ता इंडियाने अवघ्या सत्तर कोटीत तो खरेदी केला तेव्हा नेतृत्वाने काय केले. विस्तारीकरण तीन वर्ष लांबविल्यामुळे सभासदांना दहा लाख टन ऊस अन्य कारखान्यांना घालवावा लागला. हे नेतृत्व जे जे बंडखोरी करतात त्यांनाच पुन्हा पुन्हा सांभाळून घेतात आणि कुठलीही कारवाई करत नाहीत. म्हणून आता सर्वसामान्य सभासद जागरूक झाला असून तो परिवर्तन करून सर्वसामान्यांच्या परिवर्तन पॅनेलच्या सोबत राहणार आहे.
रंजन तावरे यांनी, सोमेश्वरच्या अध्यक्षांनी भाजपने बंद कारखाने चालवून दाखवावेत असे आव्हान दिले आहे. पण ते हे विसरतात की माळेगाव कारखाना आम्ही चालवून दाखविला आणि राज्यातला उच्चांकी भाव दिला. आज सोमेश्वर कारखान्याचा भाव निवडणुकीत मोठा वाटावा म्हणून माळेगावचा भाव नेतृत्वाने साडेतीनशे रूपयांनी कमी द्यायला लावला हे महापाप आहे. सत्तापरीवर्तन झालं नाही तर ७५ कोटींचं विस्तारीकरण सव्वाशे कोटींवर नेऊन ठेवतील, अशी टिका केली आणि राज्यसरकारने एफआऱपी सभासदांना एक वर्षाने मिळावी म्हणून आणि खासगी कारखान्यांना त्याचा लाभ व्हावा म्हणून तीन तुकडे करण्याचा डाव आखला होता परंतु केंद्रसरकारने तो हाणून पाडला आहे. सोमेश्वरचे माजी संचालक पी. के. जगताप यांनी, सोमेश्वर कारखान्यावरील अडीचशे कोटींचे कर्ज होते. ते सभासदांनी नव्हे तर चुकीच्या कारभाऱ्यांनी केले होते. हे कर्ज नेत्यांनी फेडलेले नाही. ते कमी भाव घेऊन सभासदांनी फेडले आहे. पण नेत्यांनी विस्तारीकरण लांबविल्यामुळे गेली तीन वर्ष सभासदांना आजूबाजूच्या कारखान्यांना ऊस द्यावा लागतोय. प्रतिटन सहाशे रूपयांचा शेतकऱ्यांना फटका देण्याचं पाप कुणी केलं? कर्जमुक्ती झाली असे सांगितले जात आहे प्रत्यक्षात कारखान्यावर दोनशे कोटींपर्यंत कर्ज आहे असा आरोप केला.