सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा-बारामती या राज्य मार्गावर सातववस्ती येथे टोलनाक्या नजीक विद्युतवाहिनीच्या कामाकरीता रस्ता खोदलेला असून, विद्युतवाहिनीचे कामकाज पूर्ण होऊनही खोदलेल्या रस्त्याची पूर्ववत दुरुस्ती झाली नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. येथील जीवघेणा खड्डा अपघातास निमंत्रण देणारा ठरत असून अनेकजण गंभीर जखमी होत आहेत. आतापर्यंत दहा ते पंधरा दुचाकी चालक या खड्यात पडून जखमी झाले आहेत.
बारामती नगरपरिषदेकडे रस्ता दुरुस्ती साठी वारंवार पाठपुरावा करूनही बारामती नगरपरिषद व स्थानिक लोप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे, परिणामी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे. या राज्यमार्गाची संततधार पावसामुळे पुन्हा एकदा दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच बांधकाम विभागाने खड्डे बुजविले होते मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती झाल्याने तात्पुरती दुरुस्ती न करता संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत. वाहतुकीचा मोठा ताण असूनही या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी, वाहनचालक, स्थानिक रहिवाशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बारामती ते पणदरे या दरम्यान सर्वाधिक खड्डे पडले असून साईटपट्याही खचल्या आहेत. मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला की खड्यात पाणी साठते वाहने गेली तो खड्डा पुन्हा मोठा होतो त्यामुळे वारंवार डांबर टाकून खड्डे भरले तरीही खड्डे पडतात यासाठी कायमस्वरूपी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अरुंद असल्याने जड वाहनांच्या वाहतूकीसाठी हा रस्ता धोकादायक आहे. वारंवार अपघात होत असतात याशिवाय अनेकांना अपघातात अपंगत्व आले आहे. गतीरोधकांनी वाहन चालकांच्या कंबरेचा भुगा केला असून अनेकांचे मणके ढीले झाले आहेत त्यामुळे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देवून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याच महिन्यात सोमेश्वर आणि माळेगाव कारखान्याचा हंगाम सुरु होत आहे त्यामुळे ऊसाची वाहने रस्त्यावरून धावणार आहेत. अपघात होण्याची शक्यता गृहीत धरुन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.
अरुंद रस्ता, रस्त्यात असलेले जीवघेणे खड्डे, खचलेल्या साईटपट्या, जीवघेणे गतीरोधक, रस्त्याच्या कडेला वाढलेली अतिक्रमणे, धोकादायक वाढलेली झाडे, सूचना फलक नसणे यामुळे सध्या हा मार्ग चर्चेत आला असून अपघात झाल्यानंतरच रस्त्याचे काम करणार का असा सवाल वाहनचालक विचारत आहेत.
COMMENTS