सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
पत्नीच्या औषधोपचारासाठी पैशांची पुर्तता होत नसल्याच्या तणावातून बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथील मनोहर संभाजी कुतवळ (वय ३५) यांनी शनिवारी (दि. २३) गळफास लावून आत्महत्या केली.
मनोहरच्या पत्नीला कॅन्सस होता. त्यामुळे ती गेली दोन महिण्यांपासुन पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होती. पुण्यातील जहांगिर रुग्णालयामध्ये पत्नीवर औषधोपचार सुरु होते. या शेतकऱ्याला रुग्णालयाकडून पैसे भरण्यास सांगितले जात होते. त्यामुळे मनोहर यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करून रुग्णालयात भरले होते. तर इतर पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. त्याचा तणाव मनोहर यांच्यावर होत होता. त्यांना रुग्णालयातुन अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर शनिवारी पहाटे झाडाला गळफास घेत मनोहरने आत्महत्या केली. मनोहर यांचे चुलते दत्तात्रय कुतवळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्या संपर्कात होते. संबंधित रुग्णालयाला बिल कमी करण्याबाबतची प्रक्रीया सुरु असतानाच मनोहर यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यानंतर मुसळे यांनी ही परिस्थिती सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने संबंधित रुग्णालय गाठले आणि तातडीने संबंधित महिलेच्या उपचाराचे संपूर्ण बिल माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रुग्णालयात दिलेली रक्कम परत करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती दत्तात्रय कुतवळ यांनी दिली.
दवाखान्याच्या बिलांसंदर्भात कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये. काहीही अडचण असल्यास धर्मादाय आयुक्तांसोबत चर्चा करावी. पुणे, सातारा, सोलापूर, नगर या चार जिल्ह्यांतील १५० पेक्षा जास्त दवाखाने धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत आहेत. त्यांमध्ये काहीतरी मार्ग काढता येतो. पण, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कोणीही घेऊ नये असे पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी सांगितले. या महिलेचे एकुण ४ लाख ४५ हजार रक्कम धर्मादाय आयुक्त फंडातुन दिली जाईल. तसेच यापुढे या महिलेवर होणाऱ्या उपचाराचा खर्च धर्मादाय कार्यालयातुन दिला जाणार असल्याचे बुक्के यांनी सांगितले.
...............................