सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची मतदान मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. मतमोजणी गुरुवारी(दि.१४) रोजी सकाळी आठ वाजता सुरु होणार असून दोन तासात दोन गटांची मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजणीसाठी ४१ टेबल, २२० कर्मचारी आणि सुमारे १०० पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
सुरुवातीला पहिल्या दोन प्राथमिक फेऱ्या पार पडल्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणी सुरु होईल. सकाळी दहा वाजता दोन गटातील चित्र स्पष्ट होणार आहे. दोन तासात दोन गटांचे नियोजन करण्यात आले असून दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कांबळे यांनी सांगितले. बारामती येथील कृष्णाई लॉन्स येथे मतमोजणी पार पडणार असून प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. याठिकाणी उमेदवार, पॅनेल प्रमुख आणि पत्रकार यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमेश्वर विकास पॅनेल आणि सोमेश्वर परिवर्तन पॅनेल मध्ये लढत झाली असून २० जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात उभे होते. मतदारांनी आपले मत कोणाच्या पारड्यात टाकले हे लवकरच स्पष्ट होणार असल्याने अनेकांची धाकधुक वाढली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद टांकसाळे, नायब तहसीलदार महादेव भोसले, अनिल ठोंबरे आदी बुधवार पासून याठिकाणी उपस्थित आहेत.
COMMENTS