सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्या गावांमधून दोन आकडी मतदार आहेत अशा गावांना संचालक पदाची संधी मिळणार नाही. तीन आकडी मतदार असणाऱ्या गावातील उमेदवारांचा विचार केला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे शनिवारी (दि.२) रोजी पार पडल्या.दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत तब्बल पाच तास अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, उमेदवारी देताना पुरंदर तालुक्याचा पण विचार करावा लागणार आहे तसेच जिरायत भाग, खंडाळा तालुका यांचा देखील विचार करावा लागणार आहे. फलटण तालुक्यातील पाडेगावकरांनी देखील मला भेटून सांगितले आहे. आमचे ६५० मतदान आहे आमचा पण विचार करा. असे सांगून पवार म्हणाले उमेदवारी न मिळाल्याने कोणीही नाराज होवू नका, रूसू नका फुगू नका. आपल्या प्रपंचाचा प्रश्न असल्याने आणि राज्यातील कारखानदारी अडचणीत असल्याने चांगल्या विचारांचे पॅनेल निवडणूक देत सोमेश्वर विकास पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. संधी न मिळणाऱ्या उमेदवारांना येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, दुध संघ यावर संधी मिळणार आहे.
यावेळी पुरंदरचे आ. संजय जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, विश्वासराव देवकाते, नीता फरांदे यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि सभासद उपस्थित होते.
COMMENTS