सोमेश्वर रिपोर्टर टीम------
अनैतिक संबंध ठेवून त्यातून जन्मलेल्या तीन महिन्यांच्या बाळाचा आईनेच खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तर, त्या अल्पवयीन मुलाने या बाळाचा मृतदेह नदीत नेऊन टाकून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. येरवडा पोलिसांनी अपहरणाच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पल्लवी भोंगे (वय ३०, रा. शेगाव, जि. बुलढाणा) हिला अटक केली असून, १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी बुलढाणा जिल्ह्यातील असून, घटस्फोटित आहे. ती शेती करते. तिला आई-वडिल नाहीत. एक भाऊ असून, तो पुण्यात असतो. दरम्यान, तिचे एका मजूराशी अनैतिक संबंध होते. त्यातून तिला दिवस गेले होते. परंतु, गावात बदनामी होईल या भीतीने ती पुण्यात भावाकडे आली होती. त्यानंतर तिने तीन महिन्यांपूर्वी एक मुलीला जन्म दिला. परंतु, आता दिवाळी गावी जायचे असल्याने या तान्हुलीची अडचण निर्माण झाली. त्यामुळे तिने तिचा खून केला.
तसेच या १३ वर्षीय मुलाला या मुलीचा मृतदेह पिशवीत घालून दिला आणि तो नदीपात्रात टाकून देण्यास सांगितले. त्यानुसार, या अल्पवयीन मुलाने मृतदेह पर्णकुटी परिसरातील नदीत टाकला. त्यानंतर शुक्रवारी पल्लवी येरवडा पोलीस ठाण्यात आली. तिने मुलं चोरीला गेले असल्याचे सांगितले. या घटनेची वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख यांनी गंभीर दखल घेत तपासाच्या सूचना केल्या. त्यानुसार, सहाय्यक निरीक्षक रविंद्र आळेकर व त्यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली.
पथकाला पल्लवी हिच्या बोलण्यावरच संशय येत होता. ती सांगत असलेली घटना संशयास्पद होती. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी दिवसभर तिच्याकडे कसून चौकशी केली. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व घटनाच पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी दुपारी पर्णकुटी परिसरातील नदीपात्रात शोध घेतला. त्यावेळी पोलिसांना एका पिशवीत या तान्हुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह टाकल्यानंतर त्या पिशवीवर दगड ठेवण्यात आला होता.