सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २० जागांसाठी आज ४६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. चार तालुक्यातील १५२ गावामधील ८३ मतदान केंद्रावर २५ हजार ५३५ मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार तोफा रविवारी (दि.१०) रोजी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी वैयक्तिक गाठीभेंटींवर भर दिला आहे. प्रचार थांबला असल्याने गेल्या आठवडाभर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या वतीने सुरु असलेल्या आरोप- प्रत्यारोपांची फैरी शांत झाल्या आहेत. सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१२) रोजी मतदान होत असून यासाठी मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आजपर्यंत जवळपास सहा वेळा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून वारंवार निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सहकार खात्याने निवडणूक घेण्यास परवानगी दिली. मात्र प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्याने उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली.
चार तालुक्यात कार्यक्षेत्र असल्याने पदाधिकाऱ्यांनाही सकाळ पासून प्रचारासाठी घराबाहेर पडावे लागत होते. वाहने, प्रसार माध्यमे, सोशल मीडिया, वैयक्तिक संपर्क, सभा आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सोमेश्वर विकास पॅनेलसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह गावातील स्थानिक पदाधिकारी यांनी कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत आजपर्यंत दिलेला उच्चांकी दर, विस्तारीकरण, शैक्षणिक संकुल तसेच कारखान्याचा प्रगतीचा अहवाल सभासदांपुढे मांडला. तर भाजपच्या वतीने ज्येष्ठ नेते आणि सोमेश्वर परिवर्तन पॅनेलचे प्रमुख दिलीप खैरे, किसान मोर्चाचे प्रदेशाअध्यक्ष वासुदेव काळे, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, पॅनेल प्रमुख दिलीप खैरे, सोमेश्वरचे माजी संचालक पी. के. जगताप आदींनी कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवत सभासदांपुढे परिवर्तनाचा कौल मागितला. सोमेश्वरनगर येथे प्रचाराच्या सांगता सभेत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने पाऊस कोणाच्या पथ्यावर पडतो हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.
सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी ८३ मतदान केंद्र आहेत. १५२ गावातील सुमारे २५ हजार ५३४ मतदार पाच गटातील २० उमेदवारांना निवडून देणार आहेत. मतदान केंद्र, मतपेठ्या आदींची संपूर्ण तयारी झाली असून शांततेत मतदान पार पाडण्यासाठी प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
-----------------------