गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते डिंभे धरण उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचा शुभारंभ
पुणे दि 9:
पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे डिंभे धरण उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचा शुभारंभ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला.
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याकडील 5 ते 25 मधील उर्वरीत अस्तरी करणाच्या कामाचा समावेश आहे. या कामामुळे शिनोली, शिंदेवाडी, पिंपळगांव घोडे, दरेकरवाडी, घोडेगांव, नारोडी, लांडेवाडी या गावांना या कामाचा फायदा होणार आहे. तसेच कालव्या शेजारील गळतीमुळे बाधीत झालेल्या जमीनींना संरक्षण मिळणार आहे. सध्या कालवा पूर्ण क्षमतेने वाहत नाही. अस्तरीकरण केल्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने वाहणार आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, प्रांताधिकारी सारंग कोडीलकर,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर उपस्थित होते.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकास आराखड्यातील कामाची पाहणी
श्री क्षेत्र भीमाशंकर येथील मंदिर परिसरात गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी भेट दिली व श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील विकास आराखड्याची माहिती घेतली.
श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यातुन भिमा नदी पात्र, मोक्षकुंड, भिमा उगम, निगडाळे ते भीमाशंकर रस्ता काँक्रीटीकरण आदी कामे सुरू आहेत. या कामाबाबत कार्यकारी अभियंता बी.एन.बहीर, प्रातांधिकारी सारंग कोडीलकर यांनी माहिती दिली.
भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे. या कामाचा आराखडा समजून घेवून भाविकांना येण्याजाण्यास सोईस्कर होईल या पद्धतीने दर्शन रांग करण्याबाबत श्री.वळसे पाटील यांनी सुचना दिल्या. तसेच विकास आराखड्या संदर्भात विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा तसेच आगामी काळात होणाऱ्या कामांचा आढावा व निधी पुर्ततेबाबत लवकरच उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचेही श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती संजय गवारी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, मधुकर गवांदे, रघुनाथ कोडीलकर, दत्तात्रय कौदरे, भिमाशंकरचे उपसरपंच दत्तात्रय हिले उपस्थित होते.