सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
डोर्लेवाडी ( ता.बारामती ) बारामती परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची आवश्यकता होती. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता भरपूर असते, फक्त त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. ती उणीव या विद्या प्रतिष्ठान भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून पूर्ण होणार आहे. ही संस्था प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखली जावी. असे आदरणीय साहेबांचे व दादांचे स्वप्न आहे .त्यांची स्वप्नपूर्ती या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून होईल अशी मला खात्री आहे .बारामती आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा पोलीस प्रशासनातील सहभाग वाढला पाहिजे .त्यांना विद्या प्रतिष्ठान ही संस्था सर्वतोपरी मदत करेल. असे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी केले .
विद्या प्रतिष्ठानच्या कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात बारामतीचे भुमिपूत्र व मंगळवेढा तालुक्याचे पोलीस निरीक्षक मा. बापूसाहेब पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, जिगर व जोश असेल तर स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळते .असे उद्गार श्री. पिंगळे यांनी काढले.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, लालासाहेब काशीद, प्रा .अंकुश खोत ,डॉ . उत्कर्षा ठाकरे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते .
या केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे .शारीरिक व बौद्धिक तयारी बरोबरच मानसिक तयारी करवून घेतली जाणार आहे. अल्पावधीतच सुमारे २५० विद्यार्थ्यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपली नाव नोंदणी केली आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. सुनील ओगले यांनी आपल्या प्रास्ताविकातून या केंद्राचे ध्येय ,उद्दिष्ट व स्वरूप कथन केले. प्रा .डॉ. संजय खिलारे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी केले तर डॉ .अमर भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS