लहान लेकरांना म्हताऱ्या आईबापाच्या स्वाधीन करून... पोटाची खळगी भरण्यासाठी साखर कारखान्यावर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

यंदाला गावाकडं पिढ्यानंपिढ्याचा दुष्काळ हटला होता...चेहऱ्यावर ते समाधान असले तरी लहान लेकरांना महाताऱ्यांच्या स्वाधीन करून कारखान्यावर ऊस तोडायला जायचं पण दुःख आहे... पण काय करणार...मुलांच्या भवितव्यासाठी मुकादमाकडून घेतलेली उचल फेडण्यासाठी ऊस तर तोडावाच लागतो...नाहीतर पोटाला काय खाणार असा सवाल पाटोदा तालुक्यातील तांबाराजोरीच्या सविता तांबे यांनी केला आहे. 
              एकाच आठवड्यावर दिवाळीसारखा सण आला असतानाही आम्ही सर्व सोडून कारखान्यावर दाखल झाले असून आता दिवाळी कोपीवरच साजरी करू अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.  
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परीसरात ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल झाल्या असून कामगारांमुळे परीसर गजबजून गेला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोमेश्वरच्या गाळप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून परीसरात राज्याच्या विविध भागातून ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहे.प्रत्यक्षात ऊसतोड सुरु झाली असून पुढील सहा महिने हे कामगार कारखाना तळावर तसेच विविध गावात ऊसतोडणी करणार आहेत.
           बीड, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर, पाटोदा, पाथर्डी, गेवराई, परभणी, यवतमाळ आदी भागातील हजारो ऊसतोडणी मजूर दरवर्षी कारखाना परीसरात दाखल होत असतात. चालू वर्षी सोमेश्वरकडे जवळपास पंधरा लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. हार्वेस्टर, बैलगाडी, ट्रक- टॅक्टर आदींच्या माध्यमातून ऊसतोडणी व वाहतूक होणार आहे. कारखाना परीसरात या मजुरांकडून राहण्यासाठी झोपड्या उभ्या केल्या जात आहेत. कारखान्याकडून त्यांना निवासासाठी चटई, बांबू, पिण्याचे पाणी, वीज आदी सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड यांनी दिली. सध्या सोमेश्वरचे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. डिसेंबर अखेर विस्तारीकरण पूर्ण होणार असल्याने जानेवारी पासून गाळप क्षमता वाढणार आहे. प्रशासन हे विस्तारीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

         बारामती तालुक्यात यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे मजूर दाखल होताच कारखान्याकडून ऊसतोडणीचे नियोजन करण्यात आले असून प्रत्यक्षात ऊसाने भरलेली वाहने कारखान्यावर दाखल झाली आहेत. कुटूंबातील एखादा- दुसरा सदस्य गावी ठेवून प्रत्येक हंगामात आम्हाला येथे यावेच लागते अशी प्रतिक्रिया ऊसतोड कामगारांनी दिली. जीवनावश्यक वस्तू, घराचे साहित्य, बैलजोडी, लहान मुलांसह ही कुटुंबे या भागात आल्याने गर्दी वाढली आहे. 
To Top