सोमेश्वर रिपोर्टर टिम - - -
प्रतिनिधी। तुळजापूर
संभळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेचा दरबारात गुरुवार (दि. ०४) अश्विन अमावस्येचा संध्याकाळी धगधगत्या अग्नी चा थरार भेंडोळी उत्सव रंगला. आई राजा उदोउदो आणि काळभैरवनाथाचा चांगभलं च्या जयघोषात अग्नीचा पेटता लोळ अंगाखांध्यावर वाहून नेण्याचा थरार सुमारे दिड तास सुरू होता. हा अग्नीचा थरार पाहण्यासाठी भेंडोळी मार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती.
दिपावलीतील प्रमुख आकर्षण भेंंडोळी चा थरार अश्विन अमावस्येचा संध्याकाळी तुळजाई नगरीत रंगला. २० - २५ तरूणांनी अग्नीचा पेटता लोळ अंगाखांध्यावर वाहून नेला. यावेळी रस्त्याचा दुतर्फा उभ्या भाविकांनी भेंडोळीवर तेल, तुप, पाणी वाहिले.
तुळजाभवानी मंदिराच्या दक्षिणेला वसलेल्या काळभैरवनाथाचा कड्यावर सायंकाळी ०७ च्या सुमारास काळभैरवनाथाचे पुजारी शुभंम पुजारी, गणेश पुजारी, वैजिनाथ पूजारी, तानाजी पुजारी, सुनिल पुजारी, प्रकाशनाथ पुजारी, सोमनाथ पुजारी आदींनी भेंडोळी प्रज्वलित केली. यावेळी मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, मंदिर संस्थान चे कर्मचारी, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पूर्वी गुरुवारी दिवसभर अमावस्ये निमित्त काळभैरवनाथाला तेलाचे अभिषेक घालण्यासाठी शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी कड्यावर मोठी गर्दी केली होती. तर भेंडोळी मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. भेंडोळी साठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.