बारामती : कोंबड्या, गाई,म्हशी, शेळ्या, दुचाकी, विद्युत मोटारा चोरल्याचे ऐकले असेल परंतु आता चोरटे झाडाचे ट्रीगार्ड पण सोडत नाहीत : मुर्टी परिसरातील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव: प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील  मुर्टी गावातील तरुणांनी एकत्र येऊन वृक्षारोपणासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा निधी उभारला . यातुन  बाराशे पन्नास झाडांची लागवड  व झाडांचे जनावरांपासुन संरक्षणासाठी तीनशे संरक्षक गार्ड लावले  .  मात्र या ट्री गार्डच्या सातत्याने चोऱ्या होत असल्याने  येथील उपसरपंच  किरण जगदाळे यांनी तिव्र संताप व्यक्त केला असून पोलीसांनी याबाबतचा छडा लावण्याची मागणी  लेखी स्वरुपात नोंदवली  आहे .

मुर्टी गावातील ग्रामपंचायत , तरुण  मंडळ , युवक यांनी एकत्र येऊन  वड , पिंपळ  ,जांभूळ , लिंब या झाडांचे वृक्षारोपण केले . गावातील रस्ते  , शाळा , बाजर तळ  , मंदिर , स्मशान भूमी  परीसरात  ही झाडे लावली आहेत . झाडांसाठी दीड लाख रुपये तर  जनावरांपासुन झाडांचे संरक्षण करण्यासाठी आणलेल्या तीनशे ट्रीगार्ड साठी दोन लाख रुपये खर्च केले आहेत . मात्र  गावातील भुरट्या चोरांमुळे ग्रामस्थ व  ग्रामपंचायत प्रशासन त्रस्त आहे . रात्री अंधाराचा फायदा घेत  ट्री गार्डच्या चोरी अज्ञात व्यक्तीकडून केली आहे .

यामुळे येथील तरुण वर्गाकडूनही संताप व्यक्त होत आहे . येथील उपसरपंच  किरण जगदाळे यांनी  या चोऱ्यांबाबत  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांकडे निवेदन दिले आहे .  तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार देऊन  या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे . दरम्यान काल वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी  घटनास्थळी भेट दिली आहे .

फोटो ओळ : मुर्टी ता . बारामती येथे रस्त्याच्या बाजूस असलेल्या  झाडांचे  ट्री गार्ड  चोरीला गेल्यामुळे गार्ड विरहीत झाड
To Top