सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिली ती चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. यासोबतच ज्या शाळा सुरू आहेत, त्या शाळांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी नवी नियमावली काढण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, आफ्रिकेच्या नव्या विषाणूच्या संसर्गाचा वेग पाहता पुन्हा शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार सुरू होता. मात्र, विषाणूचा धोका ओळखून १ली ते ४च्या शाळा या सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर ५ ते १२ पर्यंतच्या ज्या शाळा सुरू आहेत, त्यासंदर्भातही मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी शाळेत १०० टक्के उपस्थित राहावे.
कोरोना नियमावलीचे पालन करण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समिती / शाळा समितीच्या बैठकांचे आयोजन करून पूर्वतयारी करावी. सर्व शिक्षकांचे लसीकरण १०० टक्के करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कोरोनासंदर्भात सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने शाळास्तरावर आवश्यक ते नियोजन करावे. यात शाळेचे निर्जंतुकीकरण करणे, शाळा परिसर स्वच्छ करणे तसेच शारीरिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये बाकांची व बैठक व्यवस्था करावी. शिक्षक व विद्यार्थ्यासाठी मास्क, सॅनिटायझर आदींची व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे. आवश्यकतेनुसार स्थानिक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शन व मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा, सध्या अनेक पालक मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात संभ्रमित आहेत. त्यांना विश्वासात घेऊन मुलांना शाळेत पाठवावे, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना दिल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली.
COMMENTS