नीरा : प्रतिनिधी
भक्ती आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्या श्री.ज्योतिर्लिंगाची काटेबारस यात्रा सोमवार (दि.१५) उत्साहात साजरी झाली. हर भोले.. हर हर.. महादेव.... ज्योतिर्लिंग महाराज की जय... या गगनभेदी जयघोषात बाभळीच्या काटेरी ढिगावर भक्तीभावाने भाविकांनी उड्या घेतल्या. मागील वर्षी ही यात्रा रद्द झाली होती. काटेरी ढिगावर उघड्या अंगाने लोळणारे भक्त पाहण्यासाठी यावर्षी ठरावीक गावतील लोक व शिवभक्त उपस्थित होते. बारा दिवस चाललेल्या काटेबारसं यात्रेत यावर्षी तब्बल १६६ शिवभक्तांनी काटेरी फासांवर उड्या घेतल्या.
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावचे ग्रामदैवत असलेल्या ज्योतिर्लिंग महाराजांची यात्रा दिवाळी पाडव्याला सुरुवात झाली होती. प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर काकड आरती, शिवनाम जप, ध्यान, आरत्या, शिवालीलामृताचे पठन, भजन, कीर्तन सुरु झाले होते. प्रतिपदेच्या दुसर्या दिवसा पासून अकरा रात्री अनवाणी पायाने भक्त देवाप्रती आपली श्रद्धा छबिन्यात नाचुन व्यक्त केली. कुटुंबातील किमान एक सदस्यांने गोडाचा उपवास केला जातो. शनिवारी रात्री देवाची मानाची काठी व पालखी ग्रामप्रदक्षिणा करण्यासाठी निघाली. एकादशीला (रविवारी) सकाळी दहा वाजता पालखीतुन उत्सव मुर्ती नीरा नदीत स्नानासाठी नेण्यात आल्या. यावेळी गुळूंचेची ज्योतिर्लिंगाची व कर्नलवाडीच्या जोतिबाची उत्सव मुर्ती रथातून नीरेकडे मार्गक्रमण केले. दुपारी दिडच्या सुमारास उत्सव मुर्त्यांना व देवाची मानाच्या काठीला प्रसिद्ध दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. नीरा बाजारपेठेतुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पालखी रथ गुळूंचे गावात दाखल झाल्यानंतर दोन्ही पालख्या गायकवाड वस्तीतील विसावा स्थळावर विसावल्या. रात्री किर्तन संपल्यावर छबिन्याला सुरुवात केली गेली.
सोमवारी (द्वादशीला) पहाटे चार वाजता शिवभक्तांनी ओढ्यात अंघोळ करून मंदिरात पर्यंत दंडवत घातले. गुळूंचे गावसह बारा वाड्यातील लोकांनी ग्रामदैवतास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. साडेदहाच्या सुमारास मंदिरा समोर ढोलांचा आवाज घुमु लागला, भक्त मोठ्या उत्साहात छबिन्याच्या खेळ खेळू लागले. ढोल, ताशे व झांजेच्या कडकडाटात अवघा आसमंत घुमु लागला होता. अकरा वाजता मंदिरातून उत्सव मुर्तीसह दोन्ही पालख्या गावाबाहेरील काठीच्या भेटीसाठी वाजत गाजत निघाल्या. यावेळी छबिन्यात आडवा डाव खेळला गेला. बारावाजता पालख्यांनी काठीला प्रदक्षिणा घालुन आरती झाली. या दरम्यान मंदिरा समोर मानकऱ्यांनी डोक्यावर बाभळीच्या काट्यांच्या फास जमा केले. यावर्षी दोन ट्रेक भर काटेरी फास गोलाकार पद्धतीने मांडले गेले. एव्हाना मानाची काठी व दोनही पालख्या मंदिराकडे मार्गस्थ झाल्या, काटेरी ढिगा भवती आधी मानाची काठी व नंतर दोन्ही पालख्यांनी पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्या बरोबर शिवभक्तांनी शक्ती आणि भक्तीच्या जोरावर हर भोले हर हर .... महादेवच्या जयघोषात काटेरी फासावर उड्या मारुन देवा प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
सुमारे दिड तासात दिडशे भक्तांनी काट्याच्या ढिगांवर मुक्तपणे लोळण घेतली. काटेरी ढिगावर लोळणारे भक्त पाहुन भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. भगवान शिवा प्रती असलेली भक्तांची असीम श्रद्धा यावेळी दिसुन आली. काट्यांवर मुक्तपणे लोळल्यानंतर भक्तांना मंदिरात घेऊन जात होते. हे सर्व क्षण जगभरात दाखवण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी ही कष्ट घेतले. यात्रेत युवकांनी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात होती. शेवटच्या भक्ताने उडी मारल्या नंतर काटेरी फास गायकवाड परिवारातील प्रमुखांनी जाळुन टाकले.
COMMENTS