खंडाळा ! लोणंद नगरपंचायत मध्ये कोण मारणार बाजी ? चौरंगी लढतीची चिन्हे वाढली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद प्रतिनिधी/ प्रशांत म. ढावरे 

लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्ष सज्ज झाले असून यावेळेस ही निवडणुक चौरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच लोणंद नगरपंचायतच्या सत्तेची सुत्रे कोणाच्या हातात जाणार याबाबत लोकांमधे कमालीची उत्सुकता आहे. 

ऐकेकाळी लोणंद ग्रामपंचायत हि उत्पन्नाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची ग्रामपंचायत समजली जायची, मात्र भाजप सरकारच्या काळात २०१६ साली राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यात आले त्यात लोणंद नगरपंचायतचाही समावेश होता. 

लोणंद नगरपंचायतीची २०१६ साली झालेली पहिलीच सार्वत्रिक निवडणूक हि अत्यंत चुरशीची लढली गेली. पहिल्यांदाच चार प्रमुख पक्षांच्या चिन्हावर स्थानिक पातळीवर लढल्या गेलेल्या या निवडणूकीत माजी मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षीय दिग्गजांना लोणंदमधे येऊन सभा घ्याव्या लागल्या होत्या. 

लोणंदची पहिलीच नगरपंचायत निवडणूक तशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन प्रमुख पक्षातच झाली. देशातील सर्वात मोठे पक्ष असलेला भाजप लोणंद शहरात तोपर्यंत एवढा रूजलेला नव्हता आणि शिवसेनेची ताकद फक्त मोजक्या शिवसैनिकांपुरतीच मर्यादित होती त्याचा मतदान होण्यात उपयोग होणार नव्हता. अत्यंत चुरशीने झालेल्या पहिल्याच निवडणुकीत आनंदराव शेळके-पाटीलांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने सतरा पैकी आठ जागा जिंकून  सर्वाधिक जागा मिळवल्या तरीही बहुमत सिद्ध करण्यास त्या पुरेशा नव्हत्या. तर राष्ट्रवादीचा प्रतिस्पर्धी स्व. बाळासाहेब बागवान यांच्या राष्ट्रीय काँग्रेसने सहा जागा काबीज केल्या. तर पंचायत समिती खंडाळाचे माजी सभापती विनोददादा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला दोन जागेवर समाधान मानावे लागलं तर शिवसेनेला आपले खातेही उघडता आले नाही. फक्त एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता. 

या निवडणूकीत राष्ट्रवादीचा व काँग्रेसचा चेहरा असलेले दिग्गज उमेदवार आनंदराव शेळके-पाटील आणि बाळासाहेब बागवान या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला तर अनेक नवोदितांना प्रथमच राजकारणात येऊनही नगरसेवक होण्याचा मान मिळाला. राष्ट्रवादीकडून स्नेहलता शेळके पाटील, हणमंतराव शेळके, योगेश क्षीरसागर, कृष्णाबाई रासकर, मेघा शेळके, दिपाली क्षीरसागर, कुसूम शिरतोडे, लिलाबाई जाधव हे आठ उमेदवार निवडून आले तर काँग्रेसकडून विकास केदारी, राजेंद्र डोईफोडे, ॲड. पुरषोत्तम हिंगमिरे, शैलजा खरात, हेमलता कर्णवर आणि स्वाती भंडलकर असे सहा उमेदवार निवडून आले होते. भाजपकडून लक्ष्मण शेळके व किरण पवार तर अपक्ष म्हणून सचिन शेळके विजयी झाले होते. 

स्पष्ट बहुमत कोणालाच नसल्याने लोणंदचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार यावरून बरिच रस्सीखेच चालू असतानाच अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार काँग्रेसच्या गोटात दिसू लागल्यावर बहुमत सिद्ध करण्यास फक्त एक जागा कमी असलेल्या राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करून नगराध्यक्षपदाची माळ आपल्याच गळ्यात टाकण्यात यश मिळवले आणि लोणंदच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून सौ. स्नेहलता आनंदराव शेळके-पाटील या विराजमान झाल्या तर अवघ्या दोन जागा असूनही भाजपच्या लक्ष्मणराव शेळके-पाटील यांना उपनगराध्यक्ष पदाची लाॅटरी लागली. पण सगळंच सरळ रेषेत चाललं तर ते लोणंदचे राजकारण कसलं ? अवघ्या वर्षभराने नगराध्यक्षपद बाकीच्यांनाही मिळावे म्हणून राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होवून राष्ट्रवादीत फुट पडली तरीही सौ . स्नेहलता शेळके-पाटील यांनी राजीनामा दिला नाही. मात्र नंर बेकायदा बांधकाम प्रकरणी त्यांना आपले पद गमवावे लागले. 

लोणंदच्या प्रथम नगराध्यक्षा सौ स्नेहलता शेळके पाटील यांच्या नंतर नगराध्यक्ष पदाची माळ अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप च्या मदतीने अपक्ष नगरसेवक सचिन शेळके यांच्या गळ्यात पडली होती. मात्र कालांतराने इतरांनाही नगराध्यक्ष पदाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून राजीनामा देण्याऐवजी त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतं भाजपशी जवळीक साधून मुंबई येथे भाजप मधे प्रवेश केल्याने लोणंद नगरपंचायतीवर अवघे दोन नगरसेवक निवडून येऊनही पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकत आपले पद आबाधीत राखले, तर उपनगराध्यक्षपदी पहिल्यांदाच राजकारणात उतरून विजय मिळवलेले भाजपचे युवा नगरसेवक किरण पवार यांची निवड करण्यात आली. या दरम्यान अनेक घडामोडीं होत काँग्रेसचे विकास केदारी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले तर राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात व भाजपचे एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात दाखल होत संपूर्ण राजकीय समिकरणेच बदलली गेली. नगरपंचायतचा कार्यकाल एक वर्षापेक्षाही कमी उरला असताना नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तेरा जणांच्या सह्यांनिशी सातारा येथे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी ही  जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावत राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली होती त्यामुळे यावेळेस अविश्वास ठराव नक्कीच संमत होणार अशी अटकळ लोणंदकर बांधत असतानाच ऐनवेळेस राष्ट्रवादीचे गटनेते योगेश क्षीरसागर विरोधात गेल्याने नगराध्यक्ष सचिन शेळके यांचे पद नगरपंचायतचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत अबाधित राहीले. 

राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता शुन्य आहे. त्यामुळेच यावेळेस लोणंदला चौरंगी लढती पहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. मागच्या प्रमाणेच यावेळची निवडणूकही चूरशीने लढली जाणार यात शंकाच नाही. मागील वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस हेच प्रमुख प्रतिस्पर्धी होते मात्र गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी जाऊन राजकीय समिकरणे पुर्णपणे बदलली गेली आहेत. गेल्यावेळेस राष्ट्रवादीत असलेले आनंदराव शेळके-पाटील आता भाजप बरोबर आहेत त्यामुळे भाजपची ताकद लोणंदमधे निश्चितच वाढली आहे . तर मागच्यावेळी नगण्य असलेल्या शिवसेनेने संदिप शेळके-पाटील , शंभुराजे भोसले, अविनाश नलवडे यासारख्या युवा तर लक्ष्मणराव जाधव यांसारख्या जेष्ठ शिवसैनिकांनी पाच वर्षांत सेनेचा चांगला जम बसवला असल्याने यावेळेस ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या पक्षाचे खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे निश्चित आहे. तर काँग्रेसचा चेहरा असलेले बाळासाहेब बागवान यांचे निधन झाल्यानंतरही काँग्रेसने आपली मजबुती टिकवून ठेवली आहे. मात्र या सगळ्यांना खरे आव्हान डॉक्टर नितीन सावंत नेतृत्व करीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहे. मागच्या निवडणुकीप्रमाणे यावेळेसही राष्ट्रवादी हाच प्रमुख पक्ष असेल असे भाकीत अनेकजण वर्तवत असले तरी यावेळेस स्पष्ट बहुमत सिद्ध करण्यात ते यशस्वी होणार का याचे उत्तर येणारा काळच देईल
To Top