आयुष कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा
पुणे दि. ३
सहायक संचालक आयुष पुणे विभागीय कार्यालयात ग्राहक मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी अध्यक्षस्थानी होते.
यावेळी श्री. जावळीकरण यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. त्यांनी ‘पोषणाकरिता आयुर्वेद’ या विषयावर विचार व्यक्त केले. आयुर्वेद मुळापासून रोग दूर करणारी स्वदेशी उपचार पद्धती असल्याने तिचा प्रसार होणे गरजेचे आहे. सर्वांनी आयुर्वेदाचा अंगीकार करावा आणि त्यानुसार आहाराचे सेवन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. धर्माधिकारी म्हणाले, आयुर्वेद उपचार पद्धती नसून जीवनपद्धती आहे. आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहार, विहार आणि आचाराचे वर्णन आयुर्वेदात करण्यात आले आहे. आरोग्य संवर्धन करण्यासाठी औषधाएवढेच आहाराला महत्व आहे. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे महत्व जाणून घेण्याची गरज आहे.
यावेळी प्रशासकीय अधिकारी प्र.द.सोमवंशी यांनी कार्यालयाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.