सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या नोंदी घेऊन ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी केली जाणार आहे. याबाबत चेतन इनोव्हेशन व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची देखील मदत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांनी देखील बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणी करणे गरजेचे असल्याचे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
वाणेवाडी येथे किरण उत्तमराव भोसले यांच्या शेतात सोमेश्वर कारखाना, चेतन इनोव्हेशन व इंद्रजित पावरलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनच्या साहाय्याने औषध फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक सुनील भगत, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, प्रवीण कांबळे, रणजित मोरे, तुकाराम जगताप, रघुनाथ भोसले, सतिश सकुंडे, सुनील भोसले, उत्तमराव भोसले, पोपटराव भोसले, दिग्विजय जगताप, विक्रम भोसले, राजेंद्र जगताप, बापूराव गायकवाड व इंद्रजित जगताप उपस्थित होते. यावेळी चेतन इनोव्हेशन चे सुभाष जमदाडे यांनी माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत आपण सांगली जिल्ह्यातील राजारामबापू कारखान्यावर ८ ड्रोन व क्रांती कारखान्यावर १ ड्रोनच्या साहायाने सद्या औषध फवारणी होत आहे. तर कृष्णा, कागल, माळेगाव तसेच सोमेश्वर कारखान्यांच्या आमच्याकडे ड्रोनसाठी मागण्या होत आहेत. आतापर्यंत आपण एका कारखान्यावर तब्बल ४ हजार ३०० एकरांवर ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी केली आहे. हे ड्रोन स्वयंचलित असून पायलट याला रिमोट च्या साहाय्याने चालवतो. एकदा चार्ज केल्यानंतर दोन एकरापर्यंत फवारणी होऊ शकतो. अवघ्या १० लिटर पाण्यात एक एकरांवरील औषध फवारणी केली जात आहे. त्यामुळे वेळीची आणि मजुरांची बचत होत आहे. तसेच आपल्या जमिनीत कोणते घटक कमी आहेत व कोणते औषध फवारणी करावे लागेल हे सुध्दा ड्रोन सांगतो. तसेच माती परीक्षण देखील केले जात असल्याचे जमदाडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उसविकास अधिकारी विराज निंबाळकर यांनी केले तर इंद्रजित पावरलाईन चे संचालक इंद्रजित जगताप यांनी आभार मानले.