नाशिक, दि३ :
मराठी भाषा विभागाच्यावतीने ‘अभिजात मराठी दालन' उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे याची माहिती व ‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्य गाथा या दालनाच्या माध्यमातून जगासमोर पोहचणार आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ‘अभिजात मराठी दालना’चे उद्घाटन प्रसंगी केले आहे.
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी दालना’ चे उद्घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, मराठी भाषा सहसचिव मिलिंद गवांदे, अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, संमेलनाच्या सर्व समितीचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, श्रीरंग गोडबोले, उपस्थित होते.
मराठी भाषा मंत्री पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला अभिजात मराठी भाषा समजण्यासठी या दालनात मराठी भाषेच्या पुराव्याच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. संमेलनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अभिजात मराठी दालनास भेट देवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सहभागी होऊन मराठी भाषेच्या न्याय्य हक्कासाठी उभे रहावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सर्व मराठी बांधवांना केले आहे.
अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला जाणार आहे. अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, 19 व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य परंपरेचे दालन अशा दोन हजारी वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासा दरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ. निवडक गाथा आदीच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात ठेवण्यात आल्या असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राष्ट्रपतींना ‘पत्र’
केंद्र सरकारने 2004 साली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. मराठी प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. या संदर्भातील अनेक पुराव्यांनी सिध्द झाले आहे की, मराठी ही अभिजात भाषा आहे. तरी कृपया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी विंनती यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे. तसेच या दालनास भेट देणाऱ्या प्रत्येकाने या पत्रावर स्वाक्षरी करुन राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत विंनती करावी, असे आवाहनही यावेळी श्री. देसाई यांनी केले आहे.
संमेलनाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेने ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ या लघुपटाची निर्मिती केली असून यावेळी लघुपट दाखविण्यात आला. यामध्ये एक अभिरुप न्यायालय अशी संकल्पना करण्यात आली असून यात वादविवाद आणि संवादांच्या माध्यमातून जनतेपर्यंत मराठी भाषा विभागाचे म्हणणे मांडण्यात आले आहे.
मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी संपूर्ण अभिजात मराठी दालनाला भेट दिली.
COMMENTS