सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरच्या वाहतुकदारांनी कारखान्याला वेठीस न धरता नेहमी मेळ घालण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मागील हंगामात फेब्रुवारी २०२१ पासून सोमेश्वर कारखान्याच्या वाहतूकदारांना संचालक मंडळाने तोडणी वाहतुकीसाठी खर्चात साडेसात टक्के वाढ दिली. चालू हंगामाच्या दरवाढीसंदर्भात माळेगाव कारखान्यावर सुरू असलेल्या चर्चेतून जो निर्णय होईल तो निर्णय सोमेश्वर कारखानाही त्याच दिवशी लागू करेल, असे आश्वासन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी दिले.
वाणेवाडी (ता. बारामती) 'सोमेश्वर कारखाना ट्रक-ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघा'च्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यानिमित्ताने पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते संघाच्या सव्वातीनशे सदस्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा लाख रूपये किमतीच्या सतरंजीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक आर. एन. शिंदे, सोमेश्वरचे माजी संचालक नामदेव शिंगटे, नंदकुमार शिंदे, विजय थोपटे, अविनाश चव्हाण, नितीन कुलकर्णी, राजेंद्र जगताप, दत्तात्रेय सोरटे, हेमंत माळशिकारे, संदीप साळुंके, राजेश जगताप, कैलास मगर उपस्थित होते. याप्रसंगी वाहतूक संघाचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांचा 65 वा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
जगताप पुढे म्हणाले, अनेक ठिकाणी संप करून वाहतुकदार कारखान्यांना वेठीस धरत असल्याचे आपण पाहतो. परंतु सोमेश्वर कारखान्यावरील बहुतांश वाहतूकदार हे सभासदच आहेत. सभासदांचा ऊसही गेला पाहिजे, कारखानाही बंद पडला नाही पाहिजे आणि वाहतूकदारांनाही न्याय मिळाला पाहिजे या तिन्ही बाबींचा वाहतूक संघ योग्य मेळ घालत आला आहे. माळेगाव कारखान्यावर वाहतूकदारांशी चर्चा सुरू आहेत. तिथे दरवाढीचा जो निर्णय होईल तो त्वरीत सोमेश्वरही लागू करेल. सोमेश्वर कारखान्याचा पाच लाख टन ऊस तुटला आहे मात्र अजून नऊ लाख टन ऊस गाळप बाकी आहे. आपली एफआऱपी २८६७ रूपये प्रतिटन असल्याने अन्य कारखाने आपल्या एफआऱपीच्या दरात ऊस न्यायला तयार होत नाहीत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीमुळे सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याशी करार केला आहे. त्या कारखान्याला ऊस नेण्यासाठी वाहतूकदारांनी सहकार्य करावे. सचिव प्रभाकर जगताप यांनी प्रस्ताविक केले युवराज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन जगताप यांनी आभार मानले.
---
COMMENTS