काटेरी फणस....आणि गोड स्वभावाच्या लतादीदी : उपमुख्यमंत्री अजितदादांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांची फेसबुक पोस्ट लिहीत आदरांजली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
"फणस काढून देता का?" हा लतादीदींचा मंजुळ आवाज अजूनही कानात आहे. एका सामान्य कर्मचाऱ्याशी अत्यंत अदबीने बोलत आपला आवडता फणस मागणाऱ्या लतादीदी मी वीस वर्षांपूर्वी पाहिल्या.
लतादीदींनी फणसाचा गोडवा होता आणि आपल्याला त्यांच्या आवाजाचा गोडवा होता. 
मी राज्याचे तेंव्हाचे मंत्री पद्मसिंह पाटीलसाहेब यांच्याकडे स्वीय् सहायक म्हणून काम करत होतो. ते 'मुंबईत रॉयल स्टोन' या शासकीय निवासस्थानी राहत होते. माझे बरेचसे काम रॉयल स्टोनवरून असायचे. तेथून काही अंतरावरच गानकोकिळा लता मंगेशकर या 'प्रभुकुंज' या इमारती मध्ये राहत असत. 
लहानपणापासून आम्ही दिदींच्या आवाजाची जादू अनुभवत मोठ झालो. तरुण वयात लतादीदींची गाणी राजकीय व्यवहारातदेखील मनात रुंजी घालत. व्यस्त कामातून थोडा वेळ मिळाला आणि त्यांचे स्वर कानावर पडले की हलके वाटायचे. अशा लतादीदी एवढ्या जवळ राहतात  म्हटल्यावर त्यांच्याबद्दल अधिकच कुतूहल निर्माण झाले. त्यांना भेटता येईल का? असे वाटू लागले. 
         त्यावेळी आमच्यासोबत त्या बंगल्यात बाबल्या नावाची व्यक्ती काम  करीत होती. तो एक दिवस बोलता बोलता म्हणाला, "झाडाचे फणस आलेत सालाबादप्रमाणे. आता लतादीदी  फणस न्यायला नक्की  येणार. दरवर्षी  त्या येतात."  ते ऐकून आता दिदींना भेटता येणार अस वाटू लागलं.
मग रोज मी त्यांची वाट बघू लागलो. सकाळी अकरा वाजले की आमची नजर गेटवर लागलेली असायची. त्या बंगल्यात असलेल्या घाडीगावकर मावशी यांच्याशी बोललो तर त्यानीही बाबल्याच्या विधानाला दुजोरा दिलेला. त्यामुळे दिदी येणार हे पटले होतं..
          साधारण दुपारची वेळ. लतादीदी आल्या का पाहण्यासाठी सहज गेटकडे लक्ष गेलं तर साक्षात दिदी उभ्या होत्या. त्यांच्यासोबत एक माणूस होता. मी उठून उभा राहिलो. बाबल्याही धावत आला. त्यांनी बाबल्याकडे नेहमीप्रमाणे फणसासाठी विचारणा केली. "फणस आहेत का सध्या? असतील काढून देता का?" असे मंजुळ स्वरात म्हणाल्या. बाबल्यानेही अत्यंत उत्साहाने लगेच फणस काढून दिदींना दिला. दिदींना मी पहातच राहिलो. नकळतपणे मी त्यांच्यासमोर गेलो आणि दिदींचे दर्शन घेण्यासाठी आपसूकच माझे हात जोडले गेले. त्यांनीही नम्रपणे नमसकार स्वीकारला. आणि थोड्या वेळाने दिदी तिथून निघून गेल्या. आयुष्यात त्यांना खूप ऐकले, कार्यक्रमही प्रत्यक्ष अनुभवले  पण जवळून भेट तेवढीच.
 बाबल्याशी बोलताना त्यांचा ऐकलेला आवाज त्या गेल्यामुळे पुन्हा मनात रुंजी घालत आहे. स्वप्नात बघितल्यासारखा हा माझ्या आयुष्यातील प्रसंग..
काल लता दिदी गेल्या आणि हा प्रसंग आठवत राहिला. त्यांच्या दृष्टीने ही लक्षात ठेवण्यासारखी बाब नसेलहीनपन आपल्यासारख्या माणसाला एका दर्शनातही त्या अविस्मरणीय ठरतात यातच त्यांचे मोठेपण दिसते!
To Top