सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी
मेढा-केळघर विभागातील ५४गावांसाठी महत्वाचा असलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न प्रशासन जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवत असल्यामुळे पुढील महिन्यात २३मार्चला शहीद दिनाचे औचित्य साधून श्रमिक मुक्ती दल व धरण कृती समितीचच्या वतीने प्रश्न मार्गी लागेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५४ गावांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा आज नांदगणे येथे झालेल्या बैठकीत श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागत नाही म्हणून स्वामी समर्थ मंगल कार्यालय नांदगणे येथे कृती समितीच्या वतीने डॉ. पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, जावळी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, उद्योजक राजेंद्र धनावडे, आदिनाथ ओंबळे, विजयराव सावले, एकनाथ सपकाळ, विनोद शिंगटे, राजेंद्र जाधव, धनश्री शेलार, उषा उंबरकर, विद्या सुर्वे, वैशाली पवार, श्रीरंग बैलकर, भाऊसाहेब उभे, विलास शिर्के,नारायण सुर्वे, जगन्नाथ जाधव,संतोष कदम, ज्योतिबा पवार, वैभव ओंबळे, जनार्दन मोरे, सचिन सावले, विश्वनाथ धनावडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ.भारत पाटणकर म्हणाले, पाणी नसल्याने खेड्यातील युवकांनी अर्थार्जनासाठी शहरांची वाट धरली त्यामुळे गावे ओस पडत आहेत. हे चित्र बदलले पाहिजे. दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाने संघर्ष करून यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ५४गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन निर्णायक लढा उभारणार आहे.धरण मिळवू अन्यथा बलिदान करू या ध्येयाने प्रेरित होऊन २३मार्चला आयोजित ठिय्या आंदोलनात ५४गावांतील मूल-बाळासह सर्वांनी तयारीनिशी उपस्थित राहावे. हुतात्मा भगतसिंह यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे ५४गावांतील जनतेने या ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
विजयराव मोकाशी म्हणाले, प्रशासनासोबत २५नोव्हेंबर रोजी सातारा येथे झालेल्या बैठकीत प्रशासनाने प्रस्तावित बोंडारवाडी धरणात पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून देऊ असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र यावर ठोस कार्यवाही न झाल्याने ५४गावात गावोगावी बैठका घेऊन धरण होण्याबाबत कृती समिती भूमिका पटवून देणार आहे. आता सर्व तयारीनिशी २३मार्च रोजी होणारे ठिय्या आंदोलन यशस्वी करणार आहे. यावेळी मान्यवरांनी आंदोलनाबाबत आपापली भूमिका मांडली. यावेळी ५४गावांतील कार्यकर्ते ,ग्रामस्थ उपस्थित होते.एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. विजयराव सावले यांनी आभार मानले.